औरंगाबाद- सिडको एन ८ भागातील बॉटनिकल गार्डनचे बाळासाहेब ठाकरे उद्यान, असे नामकरण करण्याच्या कार्यक्रमाला महापौर कला ओझा खूप विलंबाने आल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना जाहीर झापले."शिवसेनाप्रमुखांमुळे तुम्हाला लाल दिवा, पद मिळाले आहे. त्यांचे नाव देण्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमालाही उशिरा कशा येता?' असे खैरे यांनी विचारताच महापौरांना रडू आले. अखेर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी त्यांना कसेबसे शांत केले.
नगरसेविका प्राजक्ता भाले यांच्या वॉर्डातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून या उद्यानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम आज गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नामकरण फलकाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी चार वाजेचा कार्यक्रम पावणे पाच वाजता सुरू झाला. पण महापौर आल्या नाहीत. खासदार खैरे यांचे भाषण सुरू असतानाच महापौर ओझा लगबगीने व्यासपीठाकडे येऊ लागल्या. त्यांना पाहताच खैरे यांचा पारा चढला.
"या उद्यानाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा कार्यक्रम असताना तुम्ही उशिरा आलात. हे चांगले नाही' असे उद्गार काढत खासदार खैरे यांनी
आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. भाषण आटोपल्यावर मात्र त्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली. सर्वांसमक्ष खैरे यांनी झापल्याने महापौरांना चक्क रडूच फुटले.