आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांची रस्ता पाहणी बारगळल्याने नाराजी, काम सुरू करण्यासाठी नगरसेवकांची धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारपासून प्रत्येक वॉर्डातील रस्त्यांची आपण स्वत: पाहणी करू, असे जाहीर करणा-या महापौर कला ओझा यांनी आज ही मोहीम सुरूच केली नाही. आज तीन तासांहून अधिक काळ त्यांनी सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या कामाची पाहणी करण्यात घालवला. यामुळे महापौरांनी केवळ नगरसेवकांचा राग शांत करण्यासाठीच रस्त्यांच्या पाहणीचे आश्वासन दिले का, असा सवाल नगरसेवक विचारत आहेत.

काल सर्वसाधारण सभेत पॅचवर्कची कामे झालेली नाहीत, रस्त्यांची अर्धवट कामे सुरू झालेली नाहीत, नव्या कामांचा पत्ता नाही, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवक तुटून पडले. निवडणूक तोंडावर आल्याने कामे व्हावीत, किमान सुरू तरी व्हावीत यासाठी नगरसेवकांची ही धडपड सुरू होती. त्याची दखल घेत महापौरांनी सर्वसाधारण सभेत कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना फैलावर घेतले. त्यांनी कामे झाली आहेत, असे सांगताच नगरसेवकांनी कोणत्या भागात कोणते रस्ते केले याचा तपशील देण्याची मागणी केली. दोन -चार रस्त्यांची थातूरमातूर नावे सांगत अली यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर नगरसेवक आणखीच भडकले. त्यामुळे महापौरांनी बुधवारपासून आपण स्वत: रस्त्यांची पाहणी करू व सोबत त्या भागातील नगरसेवकाला घेऊ, असे सांगितले होते.या आश्वासनामुळे नगरसेवक शांत झाले.

महापौरांचा पाहणी दौरा आज होईल या अपेक्षेने काही नगरसेविका त्यांच्या निरोपाची वाट पाहत बसल्या, पण मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या नावाखाली महापौरांनी रस्त्यांच्या कामाला फाटा दिला. महापौर कला ओझा यांनी आज अडीच-तीन तास स्मारकाला भेट देत तेथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि महत्त्वाच्या सूचनाही केल्या. पण शहरातील रस्त्यांची पाहणीच न झाल्याने नगरसेवकांमध्ये मात्र नाराजीचा
सूर दिसून आला.

आठ तारखेला उद्घाटन
मुक्तिसंग्राम स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली असून शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. त्याला पालकमंत्री रामदास कदमही उपस्थित राहणार आहेत. ठाकरे यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनीही स्मारकाच्या कामाला भेट दिली व पाहणी केली. नंतर महापौर व शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनीही भेट दिली.