आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या नाराज नगरसेवकांना ‘मातोश्री’चे दरवाजे झाले बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अपक्षाला उपमहापौरपद दिल्याने नाराज झालेले दिग्गज तसेच नवखे नगरसेवक मंगळवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. भेटीसाठी वेळ देण्याचे संकेतही मिळाले होते. परंतु ऐनवेळी या नाराजांना मातोश्रीचे दरवाजे बंद करण्यात आले. ‘तुमचे काय जे म्हणणे आहे ते संपर्कप्रमुख विनोद घोसाळकरांना सांगा, ते अहवाल देतील,’ असा निरोप देण्यात आला. घोसाळकर मंगळवारी नाराजांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत.
नाराजांना मातोश्रीवर वेळ मिळणे हा आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या फील्डिंगचा विजय मानला जातो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्याचे मार्ग बंद झाल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन राजू वैद्य हे तिघे सोमवारी सायंकाळी पुन्हा एकत्र आले होते. त्यांनी घोसाळकरांसमोर काय सांगायचे हे ठरवल्याचे समजते. अर्थात, या तिघांनी यापूर्वीच घोसाळकर यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. आता नव्याने काय सांगणार, असा प्रश्न त्यांना पडला होता.

दिवसभरता टकळत ठेवले
सोमवारी किंवा मंगळवारी उद्धव ठाकरे भेटतील, असा निरोप देण्यात आला होता. त्यानुसार तीन ज्येष्ठ नगरसेवकांबरोबरच १८ नवीन नगरसेवकही मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाले होते. परंतु सोमवारी वेळ नाही, मंगळवारी साहेब भेटतील, असा निरोप रविवारी देण्यात आल्याने सर्वांनी मंगळवारी मुंबईला जाण्याची तयारी केली. उद्याची वेळ सांगा, यासाठी ही मंडळी सकाळपासून मातोश्रीवर फोन करत होती. ‘परत फोन करतो, मेसेज करतो’ असे उत्तर मातोश्रीवरून देण्यात येत होते. सायंकाळी मात्र या तिघांना थेट घोसाळकर यांचा फोन आला. ‘या प्रकरणावर सविस्तर अहवाल देण्याचे आदेश साहेबांनी मला दिले आहेत. त्यामुळे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मी उद्या औरंगाबादला येतोय,’ असे त्यांनी सांगितले. यामुळे तिघेही चकित अन् संतप्त झाले.

निवडणुकीवर परिणाम नाही : शिवसेनेतनाराजी असली तरी त्याचा परिणाम बुधवारी होणाऱ्या महापौर तसेच उपमहापौरांच्या निवडणुकीवर होणार नाही हेही स्पष्ट आहे. शिवसेनेचे नगरसेवक कितीही नाराज झाले तरी ते मतदान युतीलाच करतील. तटस्थ राहण्याचीही शक्यता नाही.

पुढे काय होईल?
घोसाळकर या तिघांसह अन्य १८ नाराज नगरसेवकांशी मंगळवारी पुन्हा एकदा चर्चा करतील. त्यानंतर येथे काय घडले याचा अहवाल पक्षप्रमुखांकडे देतील. अर्थात, हा अहवाल शिरसाट, दानवे यांच्या सोयीचाच असेल याची कल्पना या सर्वांना आहे. त्यातून फारसे काही समोर येणार नाही हे स्पष्ट आहे. कारण घोसाळकर यापूर्वीच या नाराजांशी बोलले आहेत. नाराजांची समजूत काढण्यासाठी हा अहवालाचा फार्स आहे.

का नाकारली भेट? स्मिताघोगरे यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्यास ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात म्हणणे ऐकून घेण्यात अर्थ तो काय, असे वाटल्याने भेट नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येते.

नाराजांचे मौन : दरम्यान, या नाराज मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनीच बोलण्यास नकार दिला. निवडणुकीनंतर यावर या मंडळींकडून भाष्य होण्याची शक्यता आहे.
हे नाराज उद्धव ठाकरेंना भेटू नयेत यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फील्डिंग लावली होती. याची कल्पना या तिघांना होती. साहेबांनी फक्त पाचच मिनिटे द्यावीत, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. परंतु ही मंडळी पक्षप्रमुखांना भेटली तर बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची भीती वाटल्याने ही भेट कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात शिरसाट, दानवे यांना यश आले.
बातम्या आणखी आहेत...