आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदाच्या ऑनलाइन चाचणीत राजू शिंदे आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराचा पुढील महापौर कोण? राजू शिंदे की बापू घडामोडे, असे तर्कवितर्क लावले जात असून राजकीय क्षेत्रात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागरिकांनी मात्र महापौरपदासाठी राजू शिंदे यांना प्रातिनिधिक स्वरूपात पहिली पसंती दिली आहे. ‘पोलकोड’च्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाइन चाचणीत बापू घडामोडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता वर्षभरासाठी महापौरपद भाजपकडे राहणार आहे. महापौरपद मिळवण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केलेली आहे. दरम्यान, इंटरनेटच्या युगात ऑनलाइन मतदान घेऊन चाचपणीदेखील केली जात आहे. ‘पोलकोड’ या ऑनलाइन मतदानात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे अत्यंत निकटवर्तीय राजू शिंदे यांना ४० टक्के मते मिळाली आहेत. माजी उपमहापौर बापू घडामोडेदेखील महापौरपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना ३१ टक्के मतदान झालेले आहे. ‘पोलकोड’वर शहरातील हजार जणांनी मतदान केले आहे. त्यापैकी शिंदे यांनी हजार ६१० मते मिळवून अनेक दिवसांपासून आघाडी कायम ठेवली आहे. घडामोडे यांना हजार २५४ मते मिळाली असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. महापौरपदाचे दोघेही प्रबळ दावेदार असल्याचे सध्या चित्र असून ऑनलाइन पसंतीमध्ये शिंदे यांनी बाजी मारली आहे. मनसेतून भाजपमध्ये आलेले राज वानखेडेदेखील महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही ‘फिल्डिंग’ लावली आहे. ‘पोलकोड’वर त्यांना १३ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. ऑनलाइन झालेल्या हजार मतांपैकी वानखेडे यांना ५२९ मते मिळाली आहेत. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी शर्यतीत नसले तरीही त्यांचे नाव ‘पोलकोड’मध्ये आहे. त्यांना १५ टक्के नागरिकांनी पसंती दिली असून ६१४ जणांची मते मिळाली आहेत. अशा पद्धतीच्या कलचाचणीचा पक्षाच्या निर्णयावर काही परिणाम होतो का? हे विचारण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूरध्वनी केला, पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

‘पोलकोड’ काय आहे?
‘पोलकोड’एक संकेतस्थळ असून त्या माध्यमातून ऑनलाइन चाचपणी केली जाते. ‘कोण असावा महापौर औरंगाबादचा’ या शीर्षकाने व्हॉट्सअॅपवरून एकमेकांना लिंक फॉरवर्ड करून मतदान करून घेतले जात आहे. एका मोबाइल क्रमांकावरून एकदाच मत नोंदवता येते. मतदानानंतर त्वरित निकालाचे आकडेही मोबाइल स्क्रीनवर दिसतात. ही चाचणी सदोष असून करमणुकीचा भाग असल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे.

बातम्या आणखी आहेत...