Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Mayor Step Back On Highway Liquor Ban Issue

#Govt_High_High मोहिमेला यश, महामार्ग मद्यालये मुक्तीवरून औरंगाबाद महापौरांची माघार

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 08:10 AM IST

औरंगाबाद - शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील मद्यालयांची बंदीतून मुक्तता करण्यासाठी हे राष्ट्रीय महामार्गच मनपाच्या ताब्यात घेऊन त्यांना बंदीतून मुक्ती देण्याच्या हालचाली मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी, प्रशासनाने सुरू केल्या होत्या. गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी तसा प्रस्तावही मांडला जाणार होता. मात्र, या विरोधात दैनिक 'दिव्य मराठी' आणि divyamarathi.com ने संयुक्तरित्या चालवलेल्या#Govt_High_High मोहिमेमुळे समाजातील सर्वच स्तरांतील लोकांनी या विषयाला प्रखर विरोध केल्याने महापौर भगवान घडामोडे आणि पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरातील हायवेंसाठी मंजूर केलेल्या एक हजार कोटी रुपयांवरही अशा प्रस्तावामुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता पाहूनही त्यांना माघार घ्यावी लागली.
महानगरपालिकेला शहरातील रस्त्याची दुरुस्तीही करणे अशक्य असताना दुसरीकडे शहरातील महामार्ग मनपाच्या ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी महापौर घडामोडे आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकारही घेतला होता. महापौर अाणि पदाधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव आणावा यासाठी मद्यालयांच्या काही सदस्यांकडून त्यांच्या मनधरणीचे काम सुरू होते. तसा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याची तयारीही महापौरांनी केली होती. तत्पूर्वी सकाळी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
आयुक्तांची फोनाफोनी : ऐनवेळी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात फोन करून माहिती घेतली. त्या वेळी शहरातील अंतर्गत सहा रस्ते करण्यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपये जाहीर केल्याचे सांगण्यात आले. याच महिन्यात निधी मंजूर होऊन कामाला प्रारंभ होणार असल्याचे कळाले. त्यामुळे बकोरिया यांनी आपली भूमिका मांडत मनपाकडे या रस्त्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पहिल्या टप्यात १७ कोटींची गरज असून इतका निधी मनपाकडे नसल्याचे सांगितले. तसेच दरवर्षी त्यांची देखभाल करणेही मनपाला शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मद्यालयांसाठी महामार्ग मनपात घेण्याचा विचार आणि प्रस्तावाबाबत महापौर, पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाने माघार घेतली.
एक हजार कोटी मनपा देऊ शकत नाही म्हणून...
हायवे मनपात घेण्याबाबत चर्चा होती. मात्र, अगोदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाशी संपर्क साधून माहिती घेतली. त्या वेळी या रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपये तरतूद असून त्यास मंजुरी मिळण्याच्या मार्गावर असल्याचे समजले. त्यामुळे महामार्ग मनपात घेण्याबाबत विचार केला नाही. तसेच मनपाकडे एवढा निधीही नाही. - ओमप्रकाश बकोरिया, मनपा आयुक्त
काही जण करत होते पाठपुरावा
शहरहद्दीतीलमहामार्ग मनपात घेण्यासाठी काही जण माझ्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र, मनपाला शहरातीलच रस्ते बनवणे अवघड असल्याने महामार्गावरील खर्च तर अशक्य होता. त्यात शासनाकडून एक हजार कोटींची तरतूद या रस्त्यांसाठी असल्याने सर्वसाधारण सभेत आम्ही प्रस्ताव घेतला नाही.
- भगवान घडामोडे, महापौर
पुढील स्‍लाइडवर पाहा, दिव्‍य मराठीने केलेला पाठपुरावा...
divyamarathi.com ने असा केला पाठपुरावा...

Next Article

Recommended