औरंगाबाद - यापूर्वी जे झाले ते विसरा आणि पुढील कामाला लागा, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी पालिकेच्या अधिकार्यांना बजावले. पावसाळ्याच्या तोंडावर करायची कामे आताच हाती घ्या. नाले सफाईचे नियोजन करा, असेही ते म्हणाले.
तुपे यांनी कार्यभार स्वीकारून सहा दिवस होऊन गेले. या सहा दिवसांत त्यांनी अधिकार्यांच्या बैठका घेऊन प्रत्येकाकडील जबाबदारीची, कार्यपद्धतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही सूचना केल्या नाहीत. त्यामुळे अधिकार्यांमध्ये किंचित आळसावल्याचे वातावरण होते. मागील काळाप्रमाणेच यंदाही फार मोठी कामे अंगावर पडणार नाहीत, असाही सूर व्यक्त होत होता. त्यांना आज महापौरांनी तातडीच्या बैठकीला पूर्ण तयारीनिशी या, असा निरोप देत बोलावल्याने धक्का बसला.
या वेळी सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, गजानन बारवाल, आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तुपे म्हणाले की, सर्वच शहरांमध्ये तेथील महापालिकांचे प्रशासन पावसाळ्याला तोंड देण्याच्या तयारीला लागले आहे. ऐन पावसाळ्यात ज्या अडचणी निर्माण होतात त्यावर उपाययोजनांसाठी पावले उचलली जात आहेत. तशी
आपल्या महापालिकेने काय तयारी केली आहे, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावर महापौरांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी जे झाले ते झाले. त्याविषयी मला काहीही म्हणायचे नाही. मात्र, यापुढे विकास कामांच्या तयारीला लागा. त्यात कोणतीही कुचराई होऊ देऊ नका, असे त्यांनी बजावले. शहरात किती नाले आहेत, ते कोणत्या वसाहतीतून वाहतात, नेमक्या कोणत्या वसाहतीतील नाल्यांचे पाणी पावसाळ्यात तुंबते, याचा तातडीने अहवाल तयार करा. कर्मचार्यांची पथके स्थापन करून त्यांच्यावरील जबाबदारी निश्चित करा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
अधिकार्यांनी जबाबदारी पार पाडावी
सभागृहनेता जंजाळ यांनीही सफाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, अनेक वॉर्डांत कचरा साठल्याचे दिसते. जागोजागी कुंड्या भरून वाहत आहेत. त्याविषयी अधिकार्याला विचारणा केली तर ते माझ्याकडे २० वॉर्डांची जबाबदारी आहे, अशी उत्तरे देतात. हा प्रकार योग्य नाही. शेवटी मनापासून काम करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. सर्वांनी मिळून ठरवले तर सफाईचे काम सहज होऊ शकते. त्यासाठी मीदेखील रस्त्यावर उतरू शकतो. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी पावले उचलावी, असेही ते म्हणाले. बारवाल यांनीही सूचना केल्या.
(फोटो : महापौर त्र्यंबक तुपे यांनी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या वेळी आयुक्त प्रकाश महाजन, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, शहर अभियंता एस.डी. पानझडे आदी.)