औरंगाबाद - डिजिटल फ्लेक्सचा आविष्कार झाला अन् झटपट मोठमोठे आकर्षक बॅनर बनवणे सहज शक्य झाले. मात्र, यांचा इतका अतिरेक झाला की शहराचे विद्रूपीकरण आणि अपघातांना नवे कारण मिळाले आहे. सामाजिक जाणिवेचे भान म्हणून शहरातील जागृती मंचाने याविरुद्ध मोहीम हाती घेतली. या माेहिमेत शहराचे प्रथम नागरिक महापौर त्र्यंबक तुपे यांनी सहभागी होत शपथपत्रावर सही केली.
शहराच्या प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण करण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचे तुपे यांनी नुकतेच सांगितले आहे. मात्र, शहरातील प्रत्येक चौकात प्रामुख्याने दिसून येतात, त्या म्हणजे नेते, नगरसेवकांच्या वाढदिवसांचे, नियुक्त्यांचे, अभिनंदनाचे पोस्टर्स. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय शहर विद्रूप होत आहे. नगरसेवक आणि पदाधिकारी यांनीच पोस्टर, होर्डिंग, फलक, जाहिरात आणि स्टीकर पुढील काळात लावणार नाही अशी प्रतिज्ञा घेतल्यास या समस्येतून मार्ग काढता येईल. यासाठी जागृती मंचने आज महापौर तुपे यांची शपथपत्रावर सही घेतली. यानिमित्ताने महापौरांनी आधीच घोषित केलेल्या स्वत:च्या निर्णयावर विश्वासाची मोहर ठेवली आहे. ११२ नगरसेवकांच्याही यावर सह्या घेण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील चौकांची पोस्टर्सपासून सुटका होणार आहे. शहराचा श्वास पोस्टरमध्ये गुदमरण्यापासून रोखता येणार आहे. या वेळी प्रा. भारती भांडेकर, अॅड. अंजली कुलकर्णी, कला बोरामणीकर, अंजली फुलगीरकर यांची उपस्थिती होती.
शपथ पत्रांची मोहीम प्रशंसनीय
जागरूक नागरिक म्हणून जागृती मंचाच्या वतीने राबवण्यात येणारी ही मोहीम प्रशंसनीय आहे. मी या मोहिमेच्या बाजूने आहे. माझ्या सभागृहातील प्रत्येक नगरसेवक यामध्ये सहभागी होईल आणि शहर सुशोभीकरणात
आपले योगदान देईल असा मला विश्वास आहे. -
त्र्यंबक तुपे, महापौर
जागरूकतेचा छोटासा प्रयत्न
आमच्याया मोहिमेतून जागरूकता व्हावी. राजकारणातील व्यक्तींनीच याला आळा घातल्यास तातडीने परिणामकारक बदल दिसून येईल. यासाठी आम्ही नवनिर्वाचित नगरसेवकांपासून सुरुवात केली. प्रा.भारती भांडेकर, अध्यक्षा जागृती मंच
पायंडा
(फोटो : महापौरांचे स्वागत करताना जागृती मंचाच्या भारती भांडेकर, अंजली कुलकर्णी, कला बोरामणीकर, अंजली फुलगीरकर.)