आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाक दाबत महापौरांनी केले नाला पर्यटन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पावसाळ्याआधी पाण्याऐवजी प्लॅस्टिक कचऱ्याने दुथडी भरून दुर्गंधीने परिसराला जगणे अवघड करून टाकलेल्या शहरातील नाल्यांची महापौर त्र्यंबक तुपे यांनी नाक दाबून पाहणी केली. सकाळी सात वाजताच महापौरांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत केलेल्या या नाले पर्यटनानंतर चांगलाच संताप व्यक्त केला. यापुढे फक्त पावसाळ्यात नव्हे, तर वर्षभर नाल्यांची सफाई करा मंगळवारी नाले सफाईच्या कामाचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
सोमवारी महापौर तुपे यांनी सकाळी सात वाजता मनपाशेजारच्या नाल्यापासून पाहणीला प्रारंभ केला. कोठेही नाले सफाई झालेली नाही, नाले फक्त प्लॅस्टिक कचऱ्याने तुडुंब भरून वाहत आहेत आणि असह्य दुर्गंधीचे भपकारे येत आहेत अशा वातावरणात त्यांनी शहरातील नाले पाहिले. नाल्यांची अवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. मनपा दरवर्षी नाले सफाईवर खर्च करते, मग ही स्थिती का, असा सवाल करीत त्यांनी सफाईचे काम योग्य होत नसल्याबद्दल चीड व्यक्त केली.
दुर्गंधीचा कहर : महापौरांनीकेलेल्या या पाहणीदरम्यान प्रत्येक नाल्यावर त्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागला. अशा दुर्गंधीत आसपासचे लोक राहतात कसे, असा प्रश्नही त्यांना पडला. नाल्यांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचे सांगत त्यांनी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी नालेसफाई होत नसल्याबद्दल संतापही व्यक्त केला. ही अवस्था पाहता दरवर्षी सफाईसाठी दिला जाणारा पैसा जातो तरी कोठे, असा सवाल त्यांनी केला.
या नाल्यांची केली पाहणी : महापौरांनीमनपा इमारतीशेजारच्या नाल्याची अवस्था आधी पाहिली. नंतर रोहिला गल्ली, किले अर्कचा नाला, बारुदगर नाला, शिवसेना भवनाखालून वाहणारा नाला, औरंगपुरा भाजी मंडईचा नाला, औषधी भवनचा नाला या महाभयानक अवस्था असणाऱ्या नाल्यांची पाहाणी केली. शहरातील इतर नाल्यांचीही थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे.
महापौरांच्या सूचना
- उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त अधिकाऱ्यांसोबत याबाबत तातडीची बैठक बोलवा त्याच बैठकीत नाले सफाईच्या कामांचा निर्णय घेतला जाईल.
- शहराच्या सहाही प्रभागांत गटारींची सफाई करण्याच्या कामांसाठी सहा लाख रुपये देण्यात आले असून हे काम तातडीने सुरू करा.
- नाले सफाईच्या कामांचे मनपा आयुक्त, शहर अभियंता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे.
- नाले सफाईचे नियोजन फक्त पावसाळ्याच्या आधीच करता वर्षभर नाल्यांची साफ सफाई कशी करता येईल याचे नियोजन करा.
औषधी भवन सर्वात धोकादायक
औषधी भवनचा नाला येणाऱ्या पावसाळ्यात शहरात सर्वाधिक हाहाकार उडवू शकेल, अशी अवस्था झाली आहे. या नाल्यात प्लॅस्टिक पॉलिथिन तसेच कचरा यांचा एवढा खच झाला आहे की, औषधी भवनच्या खालून पाणी वाहून जाऊच शकणार नाही. हा नाला साफ करण्याची जबाबदारी करारानुसार औषधी भवनचीच आहे. त्यांनी मागील काळात ते काम केलेच नसल्याने ही भयावह अवस्था झाली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावून जाब विचारत तातडीने काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले. या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी, वॉर्ड अधिकारी एस. डी. जरारे, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी दिलीप सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.