आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर म्हणालेे, होय,‘स्मार्ट'च्या लॉबिंगमध्ये चुका झाल्या असतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन दिल्लीत धडक मारतील. स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत औरंगाबादचा समावेश करवून घेतील, अशी १४ लाख औरंगाबादकरांची अपेक्षा होती. त्यावर पाणी फेरले गेले. लोकप्रतिनिधी, नेते मंडळी वैयक्तिक कुरघोड्या, तंटे-बखेड्यात अडकल्याने स्मार्टसाठी राजकीय लॉबिंग झाले नसल्याचे भाष्य ‘दिव्य मराठी’ने केले होते. त्यावर लॉबिंगमध्ये लोकप्रतिनिधींच्या काही चुका झाल्या असतील, अशा शब्दांत त्यांनी खुलेपणाने कबुली दिली. स्मार्ट सिटीसाठी दिल्लीत झालेल्या एकाही बैठकीला का गेला नाहीत, या प्रश्नावर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केले. त्यांच्यासोबत झालेले सवाल-जबाब पुढीलप्रमाणे :
प्रश्न : औरंगाबादचा समावेश कशामुळे झाला नाही असे वाटते?
महापौर : कालकेंद्र सरकारने फक्त २० शहरांची घोषणा केली. जे या यादीत आले नाहीत त्या शहरांना त्यांनी त्यांचे गुणांकन तसेच वगळण्याची कारणे अजूनपर्यंत कळवलेली नाहीत. ती एकदा कळली की नेमके काय झाले आहे ते समजेल.

प्रश्न: पहिल्या यादीत येण्याची अपेक्षा होती?
महापौर : होय.उद्योग पर्यटनातील स्थान पाहता औरंगाबाद शहराचा निश्चित विचार होईल असे वाटले होते.

प्रश्न: राजकीय लाॅबिंगमध्ये कमी पडलो, लोकप्रतिनिधी मागे राहिले असे वाटते का?
महापौर : असे थेटपणे म्हणता येणार नाही. आम्ही सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या ना त्या प्रकारे स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न केलेच.

प्रश्न: साेलापूरच्या महापौरांनी प्रत्येक बैठकीला हजेरी लावली. निमंत्रण असून तुम्ही का गेला नाहीत?
महापौर : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण दोन बैठकांच्या वेळी मी रुग्णालयात होतो; पण आपल्या अधिकाऱ्यांनीही औरंगाबादची निवड व्हावी यासाठी खरेच मनापासून प्रयत्न केले. चांगली बाजू मांडली.

प्रश्न: पण लोकप्रतिनिधी मागेच राहिले, असे वाटत नाही का?
महापौर : जाणूनबुजून मागे राहिले असे नाही. काही चुका झाल्या असतील; पण त्या पुढील टप्प्यात सुधारू.

प्रश्न: तुम्ही पुढाकार घेणार का?
महापौर : होय.मी पुढाकार घेणार आहे. सगळ्यांना एकत्र आणून या वेळी औरंगाबादची बाजू जोरकसपणे मांडणार आहोत.

प्रश्न: या वेळी तरी बैठकांना जाणार आहात का?
महापौर : हो.आता पुढील काळात स्मार्ट सिटीबाबत ज्या काही बैठका होतील त्यांना मी स्वत: जाण्याचे ठरवले आहे.