आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी रोखली महापौरांची मोटार, ध्वजारोहण संपल्यानंतर पोहोचल्या महापौर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वातंत्र्यदिनी विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी गेलेल्या शहराच्या प्रथम नागरिक, महापौर कला ओझा यांची मोटार पोलिसांनी रोखली. त्यामुळे महापौर ध्वजारोहण संपल्यानंतर सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्या. लाल दिवा नसल्यामुळे ही मोटार महापौरांची आहे हे आपण ओळखू शकलो नाही, असा खुलासा मोटार अडवणारे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी केला. आपण ध्वजारोहण कार्यक्रमास जात आहोत आणि महापौर आहोत हे पोलिसांना सांगितले, पण त्यांनी कले नाही, असा आरोप ओझा यांनी केला.

सकाळी साडेनऊ वाजता विभागीय आयुक्तालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा होता. महानगरपालिकेतील ध्वजारोहण उरकल्यानंतर महापौर तिकडे रवाना झाल्या, परंतु पोलिसांनी त्यांना गेटच्या अलीकडेच थांबवले. महापौरांनी स्वतःची ओळख करून दिली, पण मुदीराज यांनी दुर्लक्ष केले. अन्य उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तोपर्यंत ध्वजारोहण झाले होते. या प्रकाराबद्दल मुदीराज यांच्याकडे विचारणा केली असता मोटारीला लाल दिवा नसल्यामुळे आपण ओळखले नाही, असा खुलासा त्यांनी केला. मी महापौर असून ध्वजारोहणासाठी जात असल्याचे आपण आधीच पोलिसांना सांगितले होते, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ओझा यांनी केला. ध्वजारोहण हे सर्वांसाठी खुले असते. जास्तीत जास्त नागरिकांनी यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात येते. त्याच कार्यक्रमात महापौरांनाच रोखण्यात आल्याने पोलिसांची भूमिका अशा वेळी नेमकी कशी असते हे स्पष्ट होते.

सहा महिन्यांपूर्वीच काढला लाल दिवा
सहा महिन्यांपूर्वी शासनाने एक आदेश काढून महापौर कला ओझा यांच्या मोटारीवरील लाल दिवा काढून घेतला. महानगरपालिकेचे आयुक्तही लाल दिवा वापरू शकत नाहीत, परंतु ते अग्निशमन विभागाच्या प्रमुखाची मोटार वापरतात. त्यावर लाल दिवा असतो. महापौरांना तशी पळवाट शोधता आलेली नाही. त्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आल्याची चर्चा या वेळी उपस्थितांत होती.