आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळे असं का वागतात, सारखं मुलगा-मुलगाच करतात ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलं खूप भावनाप्रधान असतात. भोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद घेणारी ही मुलं त्यावर सखोल विचारही करतात. अशाच विचारातून इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीने दैनंदिनीतून मांडलेल्या भावना पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येत आहेत. जाणून घेऊयात या पुस्तकाविषयी...
“धाकट्या भावालाच सगळे माया करतात, हे लोक सारखं मुलगा मुलगाच का करतात’, असा प्रश्न पडला आहे इयत्ता सातवीतील एका चिमुरडीला. दैनंदिनीतून उलगडणारे सातारा जिल्ह्यातील सोनाली गावडे हिचे भावविश्व सांगलीतील सृजन प्रकाशनने पुस्तक रूपात वाचकांसमोर आणले आहे. कोवळ्या वयात या मुलीला पडणारे प्रश्न, शाळा, घरातल्या गमतीजमती अशा आठवणींनी हे पुस्तक सजलं आहे.

अलीकडे दैनंदिनी हा वाङ्मय प्रकार सहसा कुणी हाताळत नाही. शाळकरी मुलीने दैनंदिनी लिहावी, हे अभिनंदनीय असून शाळकरी मुलीने साधलेल्या हळूवार संवादाप्रमाणेच जाणीव व्हावी, यासाठी वहीप्रमाणे रेघा मारलेल्या पानांवर ही दैनंदिनी छापली आहे. मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या घरात सोनालीचा जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सोनालीचे घर, कुटुंबातील माणसं, तिची शाळा, शिक्षक, मैत्रिणी हेच अनुभवविश्व. यात घडणाऱ्या घटनांमुळे मनावर उमटणारे ओरखडे तसेच शाळेतल्या गमतीजमती तिने या दैनंदिनीतून मांडल्या आहेत.

तिच्या बालमनाला पडलेले काही प्रश्नही दैनंदिनीत आहेत. घरात आपल्याला धाकट्या भावाला मिळालेली वेगवेगळी वागणूक पाहून असं का, हा प्रश्न तिला भेडसावत राहतो. त्यावर ती लिहिते, “सगळे असं का वागतात, सारखं मुलगा मुलगाच का करतात. मुलात एवढं काय आहे. स्त्री व्यक्ती नव्हे महाशक्ती आहे, हे लक्षात ठेवा. मुलीला कमी लेखू नका.’ दीनदुबळ्यांबाबतही तिच्या मनात अथांग करुणा आहे. म्हणूनच ती थेट शास्त्रज्ञांना आवाहन करते. ती म्हणते, “शास्त्रज्ञांच्या मेळाव्यात बोलण्याचे भाग्य मिळाले तर एकच मागणे मागेन. ते म्हणजे तुम्ही दिव्यांगांना जन्मत: धडधाकट करता येईल, असा शोध लावा.’

संवादांनी वाढवली पुस्तकाची गोडी
संवादांमुळे या दैनंदिनीचा खुमासदारपणा वाढला आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधणारी सोनाली दैनंदिनीतून व्यक्त होताना सहज संवाद साधते. "हे तुम्हाला माहीत आहे का, या वाक्याने सुरुवात करणारी सोनाली वाचकांनाही तिच्या भावविश्वात घेऊन जाते. लिहिणे लांबत चाललेय, असे जाणवताच "बरं ते जाऊ द्या’म्हणत लिहिणे थांबवते.

बातम्या आणखी आहेत...