आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meal Issue In Hostel Once Again Before Vice Chancellor

वसतिगृहातील जेवणाचा वाद दुसऱ्यांदा कुलगुरूंच्या दारात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. वसतिगृहातील जेवण निकृष्ट असल्याचा अारोप करत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या घरासमोर घोषणाबाजी केली.

विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करण्याचे कंत्राट एका हॉटेल व्यावसायिकास देण्यात आले आहे. वसतिगृह क्रमांक एकमध्ये कंत्राटदाराने जेवणात शिळी भाजी दिल्याचे शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. नंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी जेवण बनवण्याची भांडी उचलून रस्त्यावर ठिय्या मांडला. रास्ता रोको आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या भावना बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जाणून घेतल्या.

मात्र, ‘रास्ता रोको करण्याची परवानगी नाही, तुम्ही संबंधितांना जाब विचारा' असा सल्ला दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या घराकडे धाव घेतली. तिथे घोषणाबाजी करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीही कंत्राटदारामार्फत निकृष्ट जेवण देण्यात आले होते. त्या वेळीही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने सूचना देऊनही पुन्हा हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.
शुक्रवारी सकाळी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली होणार होती. बैठकीसाठी विद्यापीठात आलेल्या प्राचार्यांना या आंदोलनाचा त्रास झाला. आंदोलकांनी वसतिगृहासमोरील रस्ता अडवल्याने प्राचार्यांना प्रशासकीय इमारतीकडे जाण्यास विलंब झाला. बैठकीस वेळेवर हजर राहता आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.