आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांसविक्रीची दुकाने बंद करणार - मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेत बाधा येणार्‍या बाबी, अडथळे तत्काळ दूर केले जातील, असे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज सांगितले. अवैध मांसविक्री करणारी दुकाने तातडीने हटवली जातील, उंच इमारतींबाबत तपासणी करून निर्णय घेतला जाईल, भूमिगत गटार योजना सुरू होताच आधी हा नाला बंदिस्त केला जाईल, असे सांगत त्यांनी या महत्त्वाच्या प्रश्नावर शहराला आश्वस्त केले.

बुधवार आणि गुरुवारच्या अंकांत ‘दिव्य मराठी’ने विमानतळावर येणार्‍या विमानांना टेक ऑफ व लँडिंग करताना येणार्‍या अडथळय़ांबाबत सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला होता. त्यात गेल्या वर्षी तीनदा झेपावणार्‍या विमानासमोर पक्षी आल्याच्या घटना घडल्याचे नमूद केले होते. पक्ष्यांच्या वावराला कारणीभूत असणार्‍या अडचणी दूर कराव्यात व विमानसेवा सुरक्षित व्हावी यासाठी प्रयत्न करावे, असे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले होते. या वृत्तांताची दखल मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी मनपा काय करणार आहे हे स्पष्ट केले. आयुक्त म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या बातम्या बारकाईने वाचल्या असून त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. विमानतळ आणि विमानसेवा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याने विमानतळ प्राधिकरणाला येणार्‍या अडचणी मनपा तातडीने दूर करणार आहे.

उंच इमारतींबाबत तपासून निर्णय : या परिसरातील उंच इमारतींमुळे विमानांना अडथळे येऊ शकतात. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होते. याबाबत आयुक्त म्हणाले की, उंच इमारती व मोबाइल टॉवर यांच्याबाबत काही विशिष्ट मुद्दे विमानतळ प्राधिकरणाने निदश्रनास आणून दिले तर आम्ही ते तपासून तातडीने कारवाई करू. विमानतळाच्या परिसरात इमारती बांधताना उंचीसंदर्भात विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय महापालिका परवानगी देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अडथळे निर्माण होणारी झाडे छाटणार
विमानतळाच्या परिसरातील 40 हून अधिक डेरेदार वृक्षांमुळे पक्ष्यांची संख्या वाढते. या झाडांबाबत आयुक्त म्हणाले की, वास्तविक पाहता या विषयावर याआधी विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा झाली होती. आधी त्यांनीच झाडांची छाटणी करावी, असे सांगण्यात आले होते. पण त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याने हे काम मनपाने करण्याचे ठरले आहे. या कामासाठी मनपा एका ठेकेदाराची नियुक्ती करणार असून मनपाच्या निगराणीखाली झाडांची छाटणी होईल.

मांसविक्री दुकानांवर कारवाई करू
विमानतळालगतच्या परिसरात 60 हून अधिक मांसविक्रीची अनधिकृत दुकाने आहेत. त्याबाबत आयुक्त म्हणाले की, मनपाने या वस्तुस्थितीची व त्यामुळे निर्माण होणार्‍या धोक्याची गंभीर दखल घेतली असून ही दुकाने लवकरात लवकर हटवली जाणार आहेत. ती कारवाई लगेच सुरू होईल.

नाला बंदिस्त होईल
विमानतळाच्या भिंतीला खेटून वाहणारा नाला या परिसरातील सगळा कचरा व घाण वाहून आणतो. परिणामी त्या भागात पक्ष्यांचा वावर अधिक असतो. हा नाला बंदिस्त करावा किंवा बुजवावा, अशी मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. त्याबाबत आयुक्त म्हणाले, 365 कोटींच्या भूमिगत गटार योजनेतून हा नाला बंदिस्त केला जाईल. योजनेचे काम सुरू होताच प्राधान्याने हे काम हाती घेतले जाईल.