आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या या नेत्या स्वातंत्र्यदिनी तुरुंगात, म्हणाल्या... माझ्याशी दहशतवाद्यांसारखी वर्तणूक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या तुरुंगांत खितपत पडलेल्या गुन्हेगारांना आणि आरोपींना त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षेत सूट मिळते किंवा माफीही दिली जाते. परंतु, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दीनदुबळ्यांचा कैवार घेणाऱ्या, विस्थापितांची लढाईत अग्रेसर असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाच्या तसेच महाराष्ट्रातील आघाडीच्या नेत्या मेधा पाटकर यांचा स्वातंत्र्यदिन मात्र मध्य प्रदेशच्या धार तुरुंगात जाणार आहे.
 
 
असे आहे प्रकरण
सरदार सरोवर धरणाची उंची वाढवल्यामुळे नर्मदेच्या खोऱ्यातील तब्बल 192 गावांतील रहिवासी 40 हजार कुटुंबे पाण्याखाली येण्याचा धोका आहे. या कुटुंबांना सरकारकडून पुनर्वसनासाठी सोयीसुविधा मिळायला हव्यात, पण मिळाली फक्त आश्वासने. पुनर्वसन म्हणून जे काही दिले त्यात फक्त नावापुरत्याच सुविधा, पत्र्याच्या खोल्या; मात्र वीज-शिक्षण- आरोग्य या मूलभूत गरजांची कोणतीही व्यवस्था नाहीये.
यामुळेच चांगल्या सोयीसुविधेसह पुनर्वसनाच्या मागणीसाठी मेधा पाटकर यांनी 27 जुलैपासून धार जिल्ह्याच्या चिखलदामध्ये उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या 10व्या दिवसापर्यंत ना प्रशासनाने लक्ष दिले, ना सरकारने. पण परिस्थिती बिघडल्यावर त्यांना पोलिसी बळाचा वापर करून इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
 
'मला दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली': मेधा
मेधा यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना भेटण्याचीही मनाई होती. नंतर इंदूरहून कारने त्या बडवानीला जात असताना पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक करून धारच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. गुरुवारपासून मेधा पाटकर धारच्या तुरुंगात कैद आहेत. शुक्रवारी तांत्रिक अडचणीमुळे व्हीसीद्वारे त्यांची पेशी होऊ शकली नव्हती. शनिवारी धार न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना जामीन मिळाला, पण उर्वरित तीनवर 17 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 
सरकार माझ्याशी दहशतवाद्यांसारखा व्यवहार करत असल्याचा आरोप मेधा यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, 'माझ्यामुळे शांतता कशी भंग होईल? हे विचार करण्याच्या पलीकडचे आहे.'
 
आणीबाणीनंतर बहुदा पहिल्यांदाच एखादा सामाजिक कार्यकर्ता स्वातंत्र्यदिनी तुरुंगात...
स्वातंत्र्यदिनी कठोरातील कठोर गुन्ह्यातील आरोपीलाही त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षेतून सूट मिळते, पण सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा हा स्वातंत्र्यदिन तुरुंगातच जाईल. हे सर्व शासनाच्या धोरणांमुळे होत आहे, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. सुनील यांनी दिली. मेधा पाटकर यांच्याविरुद्ध चार प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत. पैकी एका गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाली, पण उर्वरित तीन प्रकरणांची सुनावणी 17 ऑगस्ट होणार आहे. याचाच अर्थ 14 आणि 15 ऑगस्टची रात्र त्यांना तुरुंगातच घालवावी लागेल. मेधा यांनी कॉर्पोरेट घराण्यांविरुद्ध आवाज उठवला हाच त्यांचा दोष. सध्याचे सरकार कॉर्पोरेटच्या हितांना प्राध्यान्य देत असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात. 
आणीबाणीनंतर बहुदा ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मेधा पाटकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या स्वातंत्र्यदिनी तुरुंगात राहतील. विरोधाभास असा की, ज्यांची सध्या सत्ता आहे त्यांनीच आणीबाणीला कडाडून विरोध केला होता.
बातम्या आणखी आहेत...