आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकलला प्रवेशाचे आमिष; डॉक्टरला 75 लाखांचा गंडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मंगलोरला एम.एस. ऑर्थोपेडिक्सच्या शिक्षणासाठी प्रवेशाचे आमिष दाखवून एका डॉक्टरला 75 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिल्लीतील दीपक चटर्जी व प्रतीक अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आकाशवाणी परिसरात मंजितनगर येथे राहणारे डॉ. कृष्णकुमार वेदप्रकाश शर्मा (54) यांचा मुलगा कशीशने भोपाळच्या पीपल्स कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. 15 मे 2012 रोजी ते मुलाला भेटण्यासाठी भोपाळला गेले. तेथे एका दैनिकात एमबीबीएस/बीडीएस/एमडी/एमएस व एमडीएस प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यातील मोबाइलवर शर्मा यांनी संपर्क साधला. तेव्हा प्रतीक अग्रवालने त्यांना मंगलोर येथील ए.जे. शेट्टी मेडिकल कॉलेजमध्ये एम.एस. ऑर्थोपेडिकसाठी प्रवेश सुरूअसल्याचे सांगून त्यासाठी 70 लाख रुपये डोनेशन तसेच 5 लाख फीचा डीडी आणण्यास सांगितले.

.. आणि प्रवेश प्रक्रिया लांबली!
प्रवेश प्रक्रियेबाबत शर्मांनी विचारले तेव्हा अग्रवालने दिल्लीतील मृगनयनी दिलशान गार्डन येथे बोलावले. त्यानुसार 9 जुलैला शर्मांनी उर्वरित 13 लाख रुपये चटर्जीला दिले. दुसर्‍या दिवशी शर्मा कार्यालयात गेले तेव्हा दोन्ही भामट्यांनी त्यांना कर्नाटकच्या राजीव गांधी विद्यापीठाचे नोटिफिकेशन इंटरनेटवरून काढून देत सध्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले.

असा झाला भंडाफोड
5 ऑगस्ट रोजी शर्मांना फोन आला. मुलाला घेऊन मंगलोर कॉलेजमध्ये येण्याचे सांगण्यात आले. शर्मा मंगलोरला पोहोचले, पण दोन्ही भामट्यांनी संपर्कच साधला नाही. फसवणुकीची कुणकुण लागल्याने शर्मांनी कॉलेजात चौकशी केली. तेव्हा अशी कोणतीही प्रवेश प्रक्रिया कॉलेजात सुरू नसल्याचे सांगण्यात आले.

अकरा लाख केले परत ?
बिंग फुटल्याचे लक्षात आल्यानंतर चटर्जीने काम होत नसल्याचे सांगून 17 ऑगस्टला आपण पैसे परत करत असल्याचे शर्मांना सांगितले. त्यानुसार आयसीआयसीआय बँकेचे 70 लाख रुपयांचे चार चेक दिले. हे चेक बाऊन्स झाले. शर्मांनी फसवेगिरी करणार्‍या दोघांनाही वकिलामार्फत नोटीस पाठवली. काही दिवसांनंतर अग्रवालने अकरा लाख रुपये शर्मांना दिल्याचे समजते. याचा तपास करत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात चटर्जी आणि अग्रवालविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.