आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधिका-याला संतप्त महिलांचा घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-राष्‍ट्रीय शहरी आरोग्य मिशनसाठी आयोजित केलेल्या भरतीत मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकच गोंधळ उडाला. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या उमेदवारांनी होत असलेला विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे संतप्त होत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना घेराव घातला. त्यांना जाब विचारणा-या उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात तोडफोडही केली. तसेच चपलाही भिरकावल्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर गोंधळ कमी झाला व सर्वच्या सर्व उमेदवारांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्याची घोषणा मनपाने केली.
महानगरपालिकेत राष्‍ट्रीय शहरी आरोग्य मिशन राबवण्यासाठी 134 पदे भरावयाची आहेत. त्याची भरती प्रक्रिया कालपासून सुरू झाली होती. यासाठी औरंगाबादसह मराठवाडा, नाशिक, जळगाव, बुलडाणा, सांगली, सोलापूर, यवतमाळ, नागपूर आदी भागांतून हजारो उमेदवार आले होते. त्यात बहुतांश महिलांचा समावेश होता. त्या आपल्या कुटुंबीयांसह, मुलांसह मुलाखतीसाठी आल्या होत्या. अर्ज आणि मुलाखती असा एकत्रित कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. काल पहिल्याच दिवशी परिचारिका पदाच्या 78 जागांसाठी 1365 अर्ज आले. 80 टक्क्यांच्या वर गुण घेतलेल्या उमेदवारांची यादी लावण्याचा मनपाने निर्णय घेतला आणि त्यावरून आज ठिणगी पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेत प्रारंभी 380 जणांची यादी जाहीर करण्यात आली. एकास पाच प्रमाणात ही निवड करण्यात आली. पण दूर दूरहून आलेल्या उमेदवारांना यात संशय आला. सर्व उमेदवारांची यादी जाहीर करा अशी त्यांनी मागणी केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना जाब विचारण्यासाठी हे उमेदवार चाल करून गेले. त्यांनी उमेदवारांचे समाधान करण्याऐंवजी दुरुत्तरे केल्याने उमेदवार आणखीच भडकले.
या उमेदवारांना शांत करण्यासाठी उपायुक्त रंवीद्र निकम यांनी प्रयत्न सुरू करताच डॉ. कुलकर्णी यांनी हा माझ्या विभागाचा प्रश्न आहे तुम्ही मध्ये पडू नका असे सुनावले. त्यावर निकम यांनी मग तुम्हीच सांभाळा असे म्हणत तेथून काढता पाय घेतला. याच दरम्यान काही उमेदवार संशोधन केंद्राच्या इमारतीत घुसण्याच्या प्रयत्न करू लागले. रेटारेटीत दाराच्या दोन तीन काचाही फुटल्या. या गोंधळात काहींनी चपलाही भिरकावल्या. दरम्यान स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे व सभागृहनेते किशोर नागरेही तेथे दाखल झाले.

पुढील आठवड्यात मुलाखती

परिचारिका पदाशिवाय स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 13 तारखेला मनपाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. जाहिरातीतील सर्व पदांसाठी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना पुढील आठवड्यात टप्प्याटप्प्याने मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यासाठीची तारीख व दिवस वेबसाइटवर व मुख्य कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

आयुक्त म्हणतात, अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार

या संदर्भात मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की राष्‍ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद मनपाने 10 व 11 जून या दोन दिवसांत ही भरती करण्यासाठी मुलाखतींचे आयोजन केले होते. या पदांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार आले. राष्‍ट्रीय शहरी आरोग्य अभियानातर्फे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.