औरंगाबाद - राज्यात वैद्यकीय प्राध्यापकांच्या 1200 रिक्त जागा तीस दिवसांत भरल्या जातील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी येथे केली. राज्यात एमबीबीएसच्या पाचशे जागांपैकी एकही जागा कमी होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही पण त्यांनी दिली.
तीस दिवसांची गणती कधीपासून करायची, असा प्रश्न आव्हाड यांना पत्रकारांनी केला तेव्हा त्यांनी कॅबिनेटने नोट सादर केल्याच्या दिवसापासून 30 दिवस मोजण्याची सूचना केली. रेल्वे भाडेवाढीविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. ‘कॉफी वुईथ स्टुडंट’ हा उपक्रम नरेंद्र मोदींच्या उपक्रमाची कॉपी आहे का, असे विचारले तेव्हा ‘पूर्वी नेहरू भाषण देत होते, आता मोदी नेहरूंच्या भाषणाची कॉपी करतात असे म्हणता येईल का?’, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
तातडीने नियुक्त्या अशक्य
30 दिवसांमध्ये जागा भरणे अशक्य आहे. यासाठी 50 टक्के जागा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीद्वारे आणि इतर जागा जाहिरातीच्या माध्यमातून भरल्या जातील. यादरम्यानच्या प्रक्रियेला 8 महिने ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.
छायाचित्र - वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वसतिगृहाची पाहणी करताना कँटीनमधून पोहे मागून घेतले.