आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय क्षेत्राला साहित्याची जोड आवश्यक: डॉ. अडवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वैद्यकीय क्षेत्रातील कामे ही एक कला आहे. या क्षेत्रातही नवनवे बदल होत आहेत. या बदलांना स्वीकारत वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी साहित्याची जोडदेखील आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्राची माहिती पोहोचवण्यास मदत मिळेल, असे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी व्यक्त केले. रविवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमादरम्यान ‘संजीवनी’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अडवाणी म्हणाले की, साहित्य ही घराघरांत जपली जाणारी संस्कृती आहे. त्यामुळे वैद्यकीय बाबींची माहिती साहित्याच्या माध्यमातून समोर आली, तर त्याचा उपयोग करता येऊ शकतो. सामाजिक दायित्व पार पाडतानादेखील याची मदत होईल. आजही ग्रामीण भागात हव्या तशा वैद्यकीय सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबरोबरच डॉक्टरांनी साहित्याची कास धरली तर सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचेल.

वैद्यकीय साहित्य संमेलन ही एक वेगळी संकल्पना आहे. यामुळे डॉक्टरांच्या कार्यक्षेत्राबरोबरच इतर सुप्त गुणांनादेखील वाव मिळेल, असे मत डॉ. उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केले, तर प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील बदल सर्वांसमोर आणण्यासाठी साहित्याचा वापर करायला हवा, असे मत अ‍ॅड. तळेकर यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने क्रांती चौक ते पैठण गेटपर्यंत ग्रंथदिंडीचे तसेच वैद्यकीय साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

या वेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शेख इकबाल मिन्ने, तर स्वागताध्यक्ष डॉ. उन्मेष टाकळकर, अ‍ॅड. सतीश तळेकर, वैभव दुधेकर, डॉ. विजय दहिफळे, बाबा भांड, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार एम. एम. शेख, प्रा. चंद्रकांत शिंदे, प्रा. शाहीद शेख, बाबा हिंदुस्थानी, डॉ. ए. के. शेख, डॉ. सुरेंद्र लाढी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वासासाठी विकास : डॉ. शेख मिन्ने
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास असतो. मात्र, आता या क्षेत्रालादेखील व्यावसायिक रूप आले आहे. रुग्णसेवेतील समाधान, वैद्यकीय क्षेत्रातील बदल, नव्या उपचार पद्धती याविषयी लिखाण होणे आवश्यक आहे. समाजाच्या विश्वासासाठी साहित्याला आपला मित्र करणे आवश्यक असल्याचे मत संमेलनाध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ. मिन्ने यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सुरुवात आणि बदलांविषयी माहिती दिली. दर्जेदार असे साहित्य लेखन वैद्यकीय क्षेत्रात व्हायला हवे त्यामुळे विश्वास वाढवण्यास मदत होईल, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.