आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत औषधांचा तुटवडा; रुग्ण बेहाल, नवीन धोरणाचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नवीन औषधी धोरणानुसार महत्त्वाच्या व जीवरक्षक अशा 348 औषधांच्या किमती कमी झाल्या. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मात्र कमी किंमत झालेली बहुतांश औषधे शहरात उपलब्ध नाहीत आणि जी आहेत, ती जुन्या म्हणजेच जास्तीच्या किमतीने नियमानुसार विकता येत नाहीत. त्याच वेळी अनेक औषध विक्रेत्यांनी ही औषधे परत त्या त्या निर्मात्या कंपन्यांकडे पाठवली आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा असून, रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.

नवीन औषधी धोरणानुसार पूर्वीच्या दराने औषधांची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत 29 जुलैला संपली असली तरी नवीन दरांतील बहुतांश औषधे कंपन्यांकडून उपलब्ध झालेली नाहीत. त्याचप्रमाणे मुदत संपल्यामुळे ही औषधे जुन्या दराने विकता येत नाहीत. तसेच विक्रेत्यांनी ती जास्तीच्या दराने घेतली असल्याने कमी किमतीने ती औषधी विकणे अशक्य आहे. त्यामुळेच अनेक विक्रेत्यांनी ही औषधे परत कंपन्यांकडे पाठवली आहेत. मोजकी औषधे सोडली तर नवीन किमतीनुसार लेबलिंग करून औषधे अद्याप तरी बाजारपेठेत दाखल झाली नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची मोठी पंचाईत झाली आहे. त्याचा फटका थेट रुग्णांना बसतो आहे.

‘आयसीयू’तील रुग्णांचे हाल
नाव न सांगण्याच्या अटीवर एका बालरोगतज्ज्ञाने सांगितले की, बालरुग्णांमध्ये ‘अँमॉक्सिसिलिन क्लॅव्होनिक अँसिड’सारखे प्रतिजैविक (अँटिबायोटिक) सातत्याने लागते. मात्र हे अँटिबायोटिक आठ दिवसांपासून मिळणे कठीण झाले असून, ते इकडून-तिकडून मिळवण्यासाठी अक्षरश: पळापळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे आयसीयूमध्ये दाखल असणार्‍या अनेक बालरुग्णांना ‘ट्रॅमॅडॉल’ हे वेदनाशामक हमखास लागते. ते मिळत नसल्याने अनेक बालकांना वेदनेने रडवत ठेवायचे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसर्‍या प्रकारचे वेदनाशामक असले तरी ते तितके तंतोतंतपणे लागू होत नाही व ‘ट्रॅमॅडॉल’प्रमाणे सुरक्षितही नाही. ‘स्ट्रेप्टोकिनेस’ हे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी जीवरक्षक समजले जाते; पण त्याचाही तुटवडा आहे. त्याचप्रमाणे तीव्र आम्लपित्त कमी करण्यासाठीचे ‘पेंटाप्रोझोल’ व ‘सोडाबायकाबरेनेट’, कमी झालेला रक्तदाब वाढवण्यासाठी ‘डोब्युटामाइन’, ‘क्लिंडामायसिन’ हे अतिशय उपयुक्त ठरणारे अँटिबायोटिक, तर अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरणार्‍या कॅल्शियमचाही मोठा तुटवडा असल्याने सर्व प्रकारच्या रुग्णांचे हाल होत असल्याचे बालरोगतज्ज्ञाने सांगितले. तर, शहरातील एका फिजिशियन व इंटेसिव्हिस्टने सांगितले की, आयसीयूतील व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ठरणारी ‘सिडेशन’ची औषधे-इंजेक्शन नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. अशा रुग्णांना झोपेसाठी ही औषधे आवश्यक असतात; पण ती मिळत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिल्याचेही त्यांनी सांगितले. मधुमेह व रक्तदाब कमी करणारी औषधेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

जुन्या दराने विक्री अशक्य
45 दिवसांऐवजी दोन महिने मुदतवाढ दिली असती तर हा प्रश्नच आला नसता. मुदतवाढीत जुन्या दरातील औषधांची विक्री शक्य होती आणि नुकसानही झाले नसते. विशेष म्हणजे तोपर्यंत कंपन्यांकडून नवीन दरांतील लेबलिंग केलेली औषधी बाजारात आली असती. अद्याप नवीन दरातील औषधी कंपन्यांकडून आलेली नाही. त्यामुळे तुटवडा जाणवतो आहे.
-रावसाहेब खेडकर, शहर अध्यक्ष, औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन.

लवकरच प्रश्न मिटेल
हा प्रश्न लवकरच मिटेल. तोपर्यंत रुग्णांना अडचणी येऊ नयेत म्हणून औषध विक्रेत्यांनी नवीन दराने औषधी विकावीत आणि ‘डिफरन्स’ संबंधित कंपन्यांकडून वसूल करावा, असे विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे. कंपन्यांनाही तसे कळवण्यात आले आहे.
-विराज पौनिकर, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन.

असे आहे नवीन औषधी धोरण
नवीन औषधी धोरणानुसार अतिशय महत्त्वाची व जीवरक्षक असणारी विशिष्ट 348 औषधांची ‘सीलिंग प्राइस’ (जास्तीत जास्त किंमत) निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त दराने औषधाची विक्री करता येणार नाही. त्यामुळे कंपनी कुठलीही असली तरी त्यांना हा नियम पाळावाच लागणार आहे.

‘डिफरन्स’चे काय ?
आम्ही जुन्या दराने औषधे घेतली आहेत आणि आता मुदत संपल्यानंतर ती नवीन दराने विका, असे शासन सांगते. मात्र आम्ही नवीन दराने म्हणजेच कमी दराने ती औषधी विकली तर जुन्या आणि नवीन दरातील ‘डिफरन्स अमाउंट’ कोण भरणार? आम्ही आमचे आर्थिक नुकसान करून घ्यायचे का? यातील अनेक औषध कंपन्यांनी हात वर केले आहेत. अशा वेळी आम्ही काय करायचे, असा प्रश्न नाव न सांगण्याच्या अटीवर एका औषध विक्रेत्याने विचारला.