आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधारा फोडून मेहरूण तलाव सुटला धो-धो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलावाच्या सांडव्याच्या बाजूने असलेल्या दुसऱ्या प्रवाहाच्या बांधाला भगदाड पडल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. तसेच फ्लॉटर व्हॉल्व्हमधूनही पाणी वाहत आहे. दोन्ही ठिकाणच्या गळतीमुळे आठवडाभरात लाखो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे तलावाची पातळी एक फुटाने कमी झाली आहे.

मेहरूण तलावाच्या फ्लोटर व्हॉल्व्हमधून वर्षभरापासून गळती होत असून याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. यानंतरही मनपा प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जलसाठा वाढल्याने पाण्याचा दाब वाढून तलावाला वर्षभरापासून असलेल्या लहान गळत्या मोठ्या झाल्या आहेत.

फ्लोटर व्हॉल्व्हमधून पाणी गळतीचे प्रमाण दुपटीवर गेले आहे. हे पाणी तलावाखाली असलेल्या ‘स्मृती उद्यानात’ वाहून जात असल्याने उद्यानही जलमय झाले आहे. यातून पुढे जात हे पाणी स्मशानभूमीकडील नाल्याला जाऊन मिळत आहे.फ्लोटर व्हॉल्व्हमधून दररोज किमान सात ते साडेसात लाख लिटर पाणी वाहून जात आहे. दुसरीकडे तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या दुसऱ्या मार्गावरील बांध वाहून गेल्याने तलावाला भगदाड पडले आहे.

त्यामुळे तेथूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे तेथूनही दररोज किमान १५ लाख लिटर पाणी वाहून जात आहे.

‘मेरी’कडून उत्तर नाही
फ्लोटर व्हॉल्व्हलगत असलेली गळती बंद करण्यासाठी मनपा प्रशासनाने महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटकडून (मेरी) सर्वेक्षण करून मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात पत्रव्यवहार केला होता. तलावाचे पाणी अडवण्यासाठी मातीचा बंधारा घालण्यात आल्याने गळती बंद करून बांध मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करावी? यासंदर्भात मेरीच्या अभियंत्यांकडून सर्वेक्षण झाल्यावर गळती बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार होती. दरम्यान, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने प्रशासनानेही कोणतेच पाऊल उचलले नाही.

फ्लोटर व्हॉल्व्हची गळती झाली दुप्पट
तलावाच्या उत्तरेकडील बाजूस ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या बांधाचा वापर रहदारीसाठी केला जातो. तलावातील जलपातळीत वाढ होऊन बांधाला धोका पोहचू नये, यासाठी बांधातून पाइप टाकून फ्लोटर व्हॉल्व्ह बसवण्यात आला होता. अनेक वर्षांपासून या व्हॉल्व्हचा वापर झालेला नाही. मात्र, बांधातून टाकलेली पाइपलाइन त्याच जागी आहे. या िठकाणाहून वर्षभरापासून काही प्रमाणात गळती सुरू होती. याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याकडे दिव्य मराठी’ ने लक्षही वेधले होते. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने फेब्रुवारीत २४ तासात ३.५ लाख लिटर पाणी वाहून जात होते, आता हे प्रमाण दुप्पट झाले आहे.

सुधारित प्रस्ताव शासनाकडे
^तलावाच्या बांधालगत माती, मुरूम टाकून त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महिनाभरापूर्वीच पर्यावरण िवभागाकडे १२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावास शासनाने मान्यता दिल्यास तातडीने हे काम हाती घेता येऊ शकते. अ. वा. जाधव, प्रकल्प अधिकारी.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
^तलावाच्या सांडव्यालगत असलेला भराव वाहून गेल्याने तेथून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगूनही उपयोग झालेला नाही. तातडीने भराव न घातल्यास तलावात साठलेले सगळे पाणी वाहून जाईल. सुनील महाजन, उपमहापौर.