आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपामुळे सदस्य निवड प्रक्रिया तीन तास रखडली, उपनगराध्यक्षपदी मरकड व स्वीकृत सदस्यपदी कुलकर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 खुलताबाद- आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे सुरेश मरकड काँग्रेसला मात देत विजयी झाले आहेत. दुसरीकडे भाजपने एक स्वीकृत सदस्यपद काबीज केले असून अविनाश कुलकर्णी यांची वर्णी लागत दुसऱ्या  स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचे अॅड.कैसरोद्दीन यांची  वर्णी लागली आहे.
 
 निवडणूक निर्णय अधिकारी यांची छाननी पत्रावर स्वाक्षरी नसल्याने काही सदस्यांनी यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदर स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया तीन तास  रखडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांची स्वाक्षरी वेरूळ येथे जाऊन आणल्यानंतर ही निवडणूक प्रकिया पार पाडली.
 
 यात आलेल्या ८ नामनिर्देशन पत्रांपैकी काँग्रेसचे सलीम चौधरी व अब्दुल समद टेलर तसेच शिवसेनेचे रवींद्र तंबारे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने डमी उमेदवारांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली असून स्वीकृत सदस्यांची निवडही चांगलीच गाजली.  
 
नगरपालिका निवडणूक प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपूर्वी पार पाडली. यामध्ये  काँग्रेसचे नगराध्यक्ष, ८ नगरसेवक असे ९ जण निवडून आले होते, तर भाजप ४, शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादीचे २ असे एकूण १७  नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे एकूण १८ जण नगरपालिकेत निवडून गेले आहेत. 
 
यामध्ये काँग्रेसची सदस्य संख्या निम्म्यापेक्षा जास्त आल्याने उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते, तर दुसरीकडे भाजप-शिवसेना सदस्यांची संख्या ७ असल्याने त्यांच्याकडून सुरेश मरकड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.  
 
यासह स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून सलीम चौधरी,अब्दुल समद टेलर,अॅड.कैसरोद्दीन अशा तीन जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. काँग्रेसच्या वतीने सलीम चौधरी याची निवड निश्चित करण्यात आली होती, तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेकडून शिवसेनेचे रवींद्र तंबारे तर भाजपकडून अविनाश कुलकर्णी यांचे नामनिर्देशन पत्र स्वीकृत सदस्यासाठी दाखल करण्यात आले होते. 
 
यामध्ये भाजप शिवसेनेकडून युती असल्याने शिवसेनेचे रवींद्र तंबारे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. स्वीकृत सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदर शहरात काँग्रेसकडून सलीम चौधरी व भाजप-शिवसेनेकडून रवींद्र तंबारे यांच्या नावाची चर्चा जोमाने सुरू होती. 
 
काही काळाच्या आत निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांच्याकडून छाननी होऊन आलेले बंद लिफाफ्यातील छाननी पत्र उघडून पहिले असता, त्यामध्ये काँग्रेसकडून निश्चित केलेले सलीम चौधरी व भाजप-शिवसेनेचे रवींद्र तंबारे व त्यासोबत काँग्रेसचे अब्दुल समद टेलर यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शिवसेनेचे गटनेते नरेंद्र साळुंके यांनी आक्षेप घेतला व निवडणूक प्रक्रियेदरम्यान गोंधळ उडाला.
बातम्या आणखी आहेत...