आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mercedes Benz Polytechnic Educaaation Start Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्सिडीझ प्रशिक्षणाला वेग येणार, नवीन प्रवेशही होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दोन प्रशिक्षक प्राध्यापकांच्या बदलीमुळे बंद पडायला आलेल्या मर्सिडीझ बेंझ कंपनीच्या अभ्यासक्रमाला डीबी स्टारच्या बातमीचे इंधन मिळाले आहे. हा अभ्यासक्रम अखेरची घटका मोजत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत शासनाने बदली होऊन गेलेल्या दोन्ही प्रशिक्षक प्राध्यापकांना माघारी बोलावले आहे. यामुळे दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू असणार्‍या या महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रमाचा टॉप गिअर पडणार आहे. दोन महिने उलटूनही सुरू न झालेल्या नवीन प्रवेश प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होणार आहे.

मर्सिडीझ-बेंझ कंपनीने 2009 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन संस्थेसोबत अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मॅकाट्रॉनिक्स हा एक वर्षाचा कोर्स सुरू केला. राज्यात पुण्यानंतर औरंगाबादलाच हा अभ्यासक्रम सुरू झाला. यासाठी संस्थेला मर्सिडीझ कार आणि इतर साहित्य अशी अडीच ते तीन कोटींची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती, पण प्रशिक्षण देणार्‍या प्राध्यापकांची बदली झाल्यामुळे हा अभ्यासक्रम अर्धवट राहिला. शिवाय जुलैमध्ये सुरू होणार्‍या नव्या बॅचची प्रवेश प्रक्रियाही लांबली.

प्रशिक्षकांना माघारी बोलावले
याप्रकरणी डीबी स्टारने 31 जुलै रोजी ‘मर्सिडीझ प्रशिक्षण कोर्सला ब्रेक’ हे वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या अडचणीला वाचा फोडली. त्रस्त विद्यार्थ्यांनी लगेच बातमी संचालक कार्यालयाला पाठवली. त्याची गंभीर दखल घेत तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी तत्काळ जालन्याला गेलेल्या दोन्ही प्रशिक्षक प्राध्यापकांना माघारी बोलावण्याचे आदेश काढले. प्रा. देवरे आणि प्रा. भागवत यांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत डेप्युटेशनवर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बोलावण्यात आल्याचे पत्रच संध्याकाळी प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांना मिळाले. त्याप्रमाणे आज दोघे प्रशिक्षक रुजू झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या बॅचवर असणारे संकट दूर झाले आहे. लवकरच या वर्षीच्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल, असे प्राचार्य पट्टलवार यांनी सांगितले.

जालन्याला गेलेले दोन्ही प्रशिक्षक क्लास-1 गॅझेटेड दर्जाचे होते. त्यांना परत बोलावण्याचे अधिकार प्राचार्य किंवा तंत्रशिक्षण सहसंचालकांना नव्हते. याबाबतचा निर्णय संचालकांना कक्षेत असतो. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही तसा निर्णय न झाल्यामुळे कोर्स अडचणीत आला होता. प्रवेश प्रक्रियाही खोळबंली होती. वर्गच होत नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच वेगाने हालचाली झाल्या आणि दोन्ही प्रशिक्षक प्राध्यापकांना पुन्हा आणण्यात आले.

नुकसान टळले
आमचे तीन मॉड्यूल पूर्ण झाले होते. चौथ्या महत्त्वाच्या मॉड्यूलमध्येच प्रशिक्षकांची बदली झाल्यामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. दोन महिन्यांपासून आमचे वर्गच होत नव्हते. आता आमचेच सर पुन्हा आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. - सर्व विद्यार्थी

वृत्तामुळे हालचाली झाल्या
जालन्याला गेलेल्या दोन्ही प्रशिक्षकांना परत बोलावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्यात यश येत नव्हते. डीबी स्टारने याबाबत वृत्त प्रकाशित करताच संबंधित यंत्रणा जोरात कामाला लागली आणि संध्याकाळी आमच्या हातात ऑर्डर मिळाली. आता बॅच व्यवस्थित चालेल तसेच प्रवेश प्रक्रियाही सुरू करता येईल. -प्रशांत पट्टलवार,प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन