आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercedes Machine Lock Ficsture Made In Aurangabad

र्मसिडीजच्या हृदयाला औरंगाबादचे बळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

र्मसिडीज कारच्या इंजिन निर्मितीमध्ये महत्त्वाच्या ठरणार्‍या दोन भागांपैकी एक वाळूज येथे तयार होऊन थेट र्जमनीत जाणार आहे. शहरातील एका लघुउद्योजकाने हे मोठे यश मिळवले आहे. ग्रॉब कंपनीच्या र्जमन तंत्रज्ञांनी दोन दिवसांपूर्वी वाळूजला येऊन याबाबत सामंजस्य करार केला. जगभरातील बड्या कंपन्यांना सुटे भाग पुरवणारी ग्रॉब कंपनी शहरातील लघुउद्योजकाच्या तांत्रिक कुशलतेपुढे नतमस्तक झाली आहे. ‘ग्रॉब’ ने अतिशय क्लिष्ट असलेले फिक्श्चर बनवण्याची ऑर्डर दिली. हे तंत्रज्ञान निर्यात करण्याचे मराठवाड्यातील हे पहिलेच उदाहरण आहे.
जगात कारच्या तंत्रज्ञानात र्जमनी आणि जपान हे दोन देश अग्रेसर आहेत. त्यामुळेच जगभरात त्यांचीच सद्दी चालते. मात्र, शहरातील लघुउद्योजकाने आपल्या तांत्रिक कुशलतेच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे. त्याचे नाव आहे श्रीधर नवघरे. वाळूजमधील एएसआर इंडस्ट्रीज नावाचा त्यांचा लघुउद्योग आहे. वर्षाकाठी पंधरा कोटींची उलाढाल आणि कोणत्याही इंजिनसाठी लागणारे फिक्श्चर तयार करण्याचे कौशल्य. त्यामुळे बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा, एस्कॉर्ट, महाले, ग्रीव्हज कॉटन, साटा विकास या आघाडीच्या कंपन्यांकडे त्यांनी आपली तंत्रकुशलता सिद्ध केली आहे. आता मात्र जगभरात आघाडीवर असलेल्या ग्रॉबसाठी ते काम करणार आहेत.
र्जमन तंत्रज्ञ कारखाना शोधत आले - र्जमनीच्या ग्रॉब कंपनीचे थॉमस न्यूबर्ट आणि जोसेफ स्मिथ हे दोन तंत्रज्ञ वाळूजमध्ये आले होते. त्यांच्यासोबत ग्रॉब इंडियाचे अधिकारी जे. एल. नायडू व सुरेंद्र चव्हाणदेखील उपस्थित होते. हे सर्व अधिकारी वाळूजमध्ये नवघरेंच्या छोट्याशा युनिटचा शोध घेत आले. तब्बल पाच तास थांबून त्यांनी हा कारखाना पाहिला. नवघरेंच्या उत्पादनातील दर्जा आणि अचूकता पाहून ते अवाक् झाले.
‘ग्रॉब’ची ग्लोबल दादागिरी - ग्रॉब मशीन टूल्स ही कारच्या इंजिनसाठी लागणार्‍या मशीन उत्पादनात आघाडीची कंपनी आहे. व्हीएमसी (व्हर्टिकल मशीन सेंटर) व एचएमसी (हॉरिझाँटल मशीन सेंटर) या प्रकारचे मशीनही कंपनी तयार करते. र्जमनीसह ब्राझील, चीन, अमेरिका, इंग्लंड, मेक्सिको, कोरिया या ठिकाणी शेकडो एकर परिसरात कंपनीचे उत्पादन होते. अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात कंपनीचा हातखंडा असल्याने बीएमडल्ब्यू, र्मसिडीज, फोर्ड, ऑडीसह जगभरातील आघाडीच्या गाड्यांचे भाग तयार करण्याचे काम ही कंपनी करते. त्यापैकी गाडीच्या इंजिनचे हृदय असलेल्या सिलिंडर हेडचे फिक्श्चर तयार करण्याचे काम एएसआर करणार आहे.
जपानी शिष्टमंडळाचीही भेट - श्रीधर नवघरे यांच्याकडे र्जमन शास्त्रज्ञ आले असतानाच जपान येथील मोरिसेकी मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून योकोहिरो इनाझुकी आणि काजुहिको ओईवा हे दोन अधिकारी कंपनी पाहण्यासाठी आले होते. त्यांनी नवघरे यांच्या कंपनीची पाहणी केली आणि काही सूचनाही केल्या. त्यामुळे र्जमनीनंतर जपान या आघाडीच्या देशातूनही नवघरेंना ऑर्डर मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
क्लिष्ट तंत्रज्ञ, साधा माणूस - शेतकरी कुटुंबात वाढलेले श्रीधर नवघरे हे मूळचे उदगीरचे. घरात व्यवसायाचे कुठलेही वातावरण नव्हते. उस्मानाबादेत इंजिनिअरिंग करून नोकरीच्या निमित्ताने ते औरंगाबादला आले. वर्षभर एका छोट्या कंपनीत नोकरी केली. खोलीवजा घरात चार मित्रांसोबत राहिले. त्यानंतर वाळूजमध्ये भागीदारीत कारखाना सुरू केला. 1995 मध्ये त्यांनी एएसआर इंडस्ट्रीजची स्थापना केली.
फिक्श्चर म्हणजे नेमके काय ? - कोणत्याही इंजिनचे पार्ट धरून ठेवण्यासाठी लागणारे यंत्र म्हणजे फिक्श्चर आहे. अतिशय अचूक मोजमापाचे हे काम असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणाच हे काम करू शकते. मिलिमीटरची जरी चूक झाली तरी लाखो रुपयांचे फिक्श्चर वाया जाते. शिवाय या सदोष फिक्श्चरमुळे इंजिनवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. ग्रॉबने र्मसिडीज गाडीच्या इंजिनमध्ये लागणारे सिलिंडर हेडसाठीचे फिक्श्चर बनवण्याची ऑर्डर नवघरे यांना दिली आहे. र्मसिडीजला लागणार्‍या एका फिक्श्चरची किंमत 4 ते 5 लाख रुपये आहे. मशीनची किंमत 3 ते 5 कोटी रुपयांपर्यंत असते. उत्तम फिक्श्चरमुळे गाडीचा परफॉर्मन्स चांगला की वाईट ठरतो. भारतात चेन्नई येथील फार्मस अँड गिअर ही कंपनीदेखील फिक्श्चर उत्पादनात आघाडीवर आहे.
हा देशाचा सन्मान.. - र्जमनी आणि जपान ही दोन राष्ट्रे मशीन तंत्रज्ञानाबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांना कामात खूप अचूकता लागते. तशाच कामाची क्षमता ग्रॉब कंपनीला आमच्यात दिसली. त्यामुळे र्मसिडीजच्या इंजिनमधील सिलिंडर हेडला लागणार्‍या होलिंडग फिक्श्चरसाठी ग्रॉबने माझ्या छोट्या कंपनीसोबत करार केला. हा भारत देशाचा सन्मान आहे. माझ्या वीस वर्षांच्या कष्टाचे खर्‍या अर्थाने चीज झाले. - श्रीधर नवघरे, संचालक, एएसआर इंडस्ट्रीज, वाऴूज
यश मिळवले पण... - इतके दज्रेदार उत्पादन तयार करणार्‍या श्रीधर नवघरेंचे दोन छोटे युनिट वाळूज भागात आहेत. त्यांच्याकडे फिक्श्चर तयार करण्यासाठी भारतातील दिग्गज कंपन्यांच्या ऑर्डर वाढत आहेत. त्यांना याच वर्षीचा मानाचा जिल्हा उद्योजक पुरस्कारदेखील मिळाला. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच मोठा कारखाना उभारण्यासाठी एमआयडीसीकडे जागा मागितली; पण त्यांना अजूनही जागा मिळाली नाही. शासनाला उद्योजकांचे कोणतेही कौतुक नाही हेच यावरून दिसते. तीन वर्षांत नवघरेंना अनेकांची कामे परत करावी लागली. आता त्यांच्याकडे कामांची वेटिंग लिस्ट आहे. मोठय़ा उद्योजकांना पायघड्या अन् छोट्यांकडे ढुंकूनही न पाहण्याच्या धोरणाचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसत आहे. बेरोजगारी वाढत असताना रोजगारनिर्मिती करणार्‍या उद्योगांना पाठबळ देण्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.