आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercedes Training Stop For Some Days News In Marathi

मर्सिडीझच्या प्रशिक्षणाला पुन्हा एकदा ब्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना करिअरची संधी देण्यासाठी मर्सिडीझ बेंझ कंपनीने शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू केलेला प्रशिक्षण कार्यक्रम चार महिन्यांपासून बंद पडला आहे. प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या दोन प्रशिक्षकांची जालन्याला पुन्हा बदली झाल्यामुळे संस्थेला नवीन बॅच सुरू करणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या वर्षीही याच दोन प्रशिक्षकांची बदली झाल्यामुळे हा प्रकार घडला होता. त्यावर डीबी स्टारने ३१ जुलै २०१३ रोजी मर्सिडीझ प्रशिक्षण कोर्सला ब्रेक हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे या प्रशिक्षकांना माघारी बोलावण्यात आले, मात्र यावर्षीही तसाच प्रकार घडला आहे. संस्थेने पुण्याहून दोन प्रशिक्षक मिळावेत यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे, परंतु अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही.

ऑटोमोबाइल क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. पूर्वीच्या कारमध्ये ९० टक्के मेकॅनिकल, तर केवळ १० टक्के इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स भाग असायचे. परदेशी कंपन्यांच्या कारमध्ये हे प्रमाण ५०-५० टक्के आहे. नव्याने येणाऱ्या जवळपास सर्वच कारमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे. यामुळे कारच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत काही वर्षांपूर्वी घेतलेले ज्ञान कालबाह्य होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मर्सिडीझ-बेंझ कंपनीने शहरातील शासकीय तंत्रनिकेतन संस्था म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकसोबत सामंजस्य करार करून एक अभ्यासक्रम सुरू केला. मात्र, पाच वर्षांतच यास उतरती कळा लागली आहे.

पुणे आणि औरंगाबादचीच निवड
मर्सिडीझ कंपनीला देशभरातील डीलर आणि सर्व्हिस सेंटरमध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी कंपनीचे स्वत:चे प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र, कंपनीचा वाढलेला व्याप बघता ते अपुरे पडू लागले. यामुळे कंपनीने पुण्यातील शासकीय

तंत्रनिकेतनसोबत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी करार केला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे औरंगाबादेतील पॉलिटेक्निक कॉलेजनेही असे प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी दर्शवली. कंपनीने संस्थेची यंत्रणा, जागा आदीची सखोल माहिती घेतली. त्यानंतर २००९ मध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह मॅकाट्रॉनिक्स हा एक वर्षाचा आणि चार मोड्यूलमध्ये विभागलेला अभ्यासक्रम सुरू झाला. राज्यात पुण्यानंतर औरंगाबादलाच मर्सिडीझसोबतचा हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मान मिळाला.
असा आहे अभ्यासक्रम
या कोर्सच्या प्रवेशासाठी मॅकेनिकल, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनची पदवी किंवा पदविका असणारे विद्यार्थी पात्र ठरतात, तर मर्सिडीझमार्फत देशभरातील शोरूम आणि सर्व्हिस स्टेशनमधून दरवर्षी पाच जणांना या कोर्ससाठी पाठवले जाते. ९० टक्के प्रात्यक्षिक आणि १० टक्के थिअरी असे याचे स्वरूप आहे. कंपनीने यासाठी ३५ लाख रुपयांची मर्सिडीझ कार उपलब्ध करून दिली आहे, तर २ इंजिन, पीसीबी, कारमधील बिघाड सांगणारे सॉफ्टवेअर अशी तब्बल २ ते २.५ कोटी रुपयांची यंत्रसामग्री येथे देण्यात आली आहे. दरवर्षी जून महिन्यात याची जाहिरात निघून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मर्सिडीझने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे लेखी परीक्षा घेतली जाते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मर्सिडीझ आणि पॉलिटेक्निकचे प्रमाणपत्र मिळते. मर्सिडीझसोबतच कार निर्मितीत असणाऱ्या इतर कंपन्या तसेच इलेक्ट्रॉनीक्स व सेन्सार क्षेत्रात काम करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळते. कोर्सचे शुल्क ७० हजार रुपये आहे.

बदलीने बोजवारा
हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी संस्थेने प्रा. डी. डी. देवरे आणि प्रा. एम. एल. भागवत यांची निवड केली. त्यांना मर्सिडीझने पुण्यात खास एक वर्षाचे प्रशिक्षण दिले होते. पूर्वी हे दोघे औरंगाबादेत कार्यरत होते, परंतु त्यांची जालन्याला बदली झाली होती. या अभ्यासक्रमासाठी त्यांना डेप्युटेशनवर पुन्हा औरंगाबादेत बदली मिळाली. मात्र, ३१ मे २०१३ रोजी डेप्युटेशनचा कालावधी संपला आणि त्यांना पुन्हा जालन्याला जावे लागले. पॉलिटेक्निकने शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांचे औरंगाबादेतील डेप्युटेशन डिसेंबर २०१३ पर्यंत वाढवून घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून त्यांना ३१ मे २०१४ पर्यंत औरंगाबादेत प्रतिनियुक्ती मिळाली. मात्र, यानंतर ते मध्येच परत गेले असते तर सुरू असलेल्या बॅचचे नुकसान झाले असते. यामुळे जालना आणि औरंगाबाद पॉलिटेक्निकने सामंजस्याने त्यांना ऑक्टोबरपर्यंत येथे ठेवून घेतले. अशा प्रकारे सप्टेंबर २०१४ मध्ये ही बॅच संपली. नंतर ७ ऑक्टोबरला दोघांना जालन्यासाठी रिलीव्ह करण्यात आले.

कोर्स आऊटसोर्स करण्याचा विचार
अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. प्रशिक्षक नसल्यामुळेच आम्हाला यंदाची बॅच सुरू करता आलेली नाही; पण आता या अडचणींंची मालिका संपणार आहे. पुण्याहून दोन प्रशिक्षक तसेच आमचे दोन प्रशिक्षक अशी चार जणांची चांगली टीम तयार होऊन कोर्स पूर्ववत सुरू करू. भविष्यात दोन खासगी ट्रेनर तयार झाल्यावर कोर्स त्यांच्याकडे आऊटसोर्स करू. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन देणार नाही. मर्सिडीझ कंपनी गुणवत्तेच्या बाबतीत काटेकोर आहे; पण कोर्स बंद करण्याचा प्रश्नच नाही. सर्वकाही नीट झाले तर जानेवारीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करू.
-प्रा. प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन