आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश रमजानचे: रमजान आणि संयम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवित्र कुराण ही एक जीवनशैली आहे. त्याचप्रमाणे तो जीवनविषयक दुष्टिकोन देणाराही मौलिक ग्रंथ आहे. पवित्र कुराणात संयमाविषयी महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे आणि संयम हा एक उदात्त जीवनादर्श मानला आहे. याचा प्रत्यय पवित्र रमजान महिन्यामध्ये सातत्याने येतो.


प वित्र कुराणासंबंधी एका भाष्यकारानं पुढील विधान केले आहे. ‘पवित्र कुराण ही एक जीवन शैली आहे. त्याचप्रमाणे तो जीवनविषयक दुष्टिकोन देणाराही मौलिक ग्रंथ आहे’. पवित्र कुराणात संयमाविषयी महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे आणि संयम हा एक उदात्त जीवनादर्श मानला आहे. याचा प्रत्यय पवित्र रमजान महिन्यामध्ये सातत्याने येतो. संयमाचा संबंध मुख्यत्वे करून आपल्या मनाशीच येतो. भरकटणारं मन नियंत्रणात ठेवण्यासाठी संयम हे एक प्रभावी आणि सर्मथ साधन आहे. मनाच्या भोवती विकारांची वलये वेढली जातात. त्यामुळे आपण उदात्त जीवनादर्शांपासून दूर जातो. लोभ, काम, क्रोध, मोह, मद इत्यादी षड्विकार प्रत्येकामध्ये असतात. त्या असत प्रवृत्ती आहेत त्यांचा प्रभाव आपल्यावर पडला की, आपले स्खलन किंवा अध:पतन होते. त्यामुळे ज्या उद्दिष्टांसाठी आपल्याला हे मौलिक ऐहिक जीवन लाभले आहे. ती उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करता येत नाहीत. म्हणून आपल्यामध्ये ज्या असत प्रवृत्ती आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे नियंत्रण आपण संयमाच्या साहाय्याने ठेवू शकतो आणि आपल्यामधील चांगल्या आणि सत्प्रवृत्तीची जपणूक करू शकतो.

रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘ इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो. हे वर्षातल्या पुढच्या महिन्यांसाठी जीवनाची वाटचाल करण्याकरिता जणू एक पायवाट असते. त्यामुळे आपले आत्मबल वाढते. विकारावर नियंत्रण ठेवण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ती पुढे आपली जीवनशैली होऊन जाते. हाही रमजानच्या पवित्र महिन्याचा मोठा लाभच आहे, असे म्हणायला हवे. उपवासाची संकल्पना जवळपास सर्वच धर्मांत आहे. जैनधर्मीयांमध्ये पयरुषणपर्वात अशाच प्रकारचे उपवास असतात. लंघनाची संकल्पना इस्लाम धर्मातील रोजाशी बरीचशी मिळती जुळती आहे. उपवासामध्ये फराळ किंवा पाणी घेता येते. रोजामध्ये मात्र अशाप्रकारे काहीच घेता येत नाही. रोजा असताना थुंकी सुद्धा गिळता येत नाही. यातून रोजामधील संयमाचा स्थायीभाव आपल्याला सहज लक्षात येईल.

इस्लामधर्म चांद्रवर्ष मानत चांद्रवर्षामुळे रमजान हा महिना वेगवेगळ्या ऋतूत येऊ शकतो. परिणामी प्रत्येक रमजानमध्ये वेगवेगळे हवामान असते. त्याच्याशी जुळवून घेताना संयमाचे वेगवेगळे पदर उलगडू लागतात आणि त्यानुसार इंद्रियांना आणि मनाला संयमाच्या आधारे वेगवेगळे वळण लावावे लागते. उन्हाळ्यातील ऊन ,हिवाळ्यातली थंडी आणि पावसाळ्यामधील पाऊस आणि गारवा. अशा सर्वच प्रकारच्या वातावरणात इस्लामधर्मीय अत्यंत संयमाने आणि निष्ठेने रोजे करीत असतात. त्यात कधीही खंड पडत नाही. हे रमजानमधील रोजाचे वैशिष्ट्य आहे.