आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हसोबानगरवासीयांचा ठिय्या, जंजाळ यांना घेराव घालून आरक्षण उठवण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगररचना विभागाने तयार केलेल्या शहर विकास आराखड्यात नागरिकांच्या घरांवर आरक्षण टाकण्यात आले. त्याविरोधात म्हसोबानगरवासीयांनी सोमवारी मनपात एक तास ठिय्या देऊन सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक विजय औताडे यांच्याकडे कैफियत मांडली. तेव्हा जंजाळ यांनी घरांवरील आरक्षण उठवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

शहराच्या नवीन विकास आराखड्यात नगररचना विभागाने म्हसोबानगरमधील गट क्रमांक १७१, १८१, १७२, १८२ आणि १६५ मध्ये खेळाचे मैदान आणि शाळांचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांची घरे बाधित होणार आहेत. या सर्व गटांत नागरी वसाहती असूनही हे आरक्षण टाकल्याने भेदरलेल्या नागरिकांनी रविवारी पालकमंत्री रामदास कदम यांना भेटून आरक्षण हटवण्याची मागणी केली, तर सोमवारी सायंकाळी शेकडो महिला आणि नागरिकांनी जंजाळ औताडे यांची भेट घेतली. तासभर नागरिकांनी ठिय्या मांडला. शेकडो नागरिकांच्या घरांच्या कागदपत्रांचे गठ्ठे आणले गेले. नागरिकांच्या गाऱ्हाण्यांनंंतर हे आरक्षण काढण्याची जबाबदारी आमची असूनसर्वसाधारण सभेतही ठराव मांडणार असल्याचे औताडे यांनी सांगितले. एकाही नागरिकांना बेघर व्हावे लागणार नाही. जेथे नागरिकांच्या घरांवर आरक्षण टाकले ते काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जंजाळ यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक बन्सी जाधव, हेमंत दीक्षित, शारदा घुले, राजन गायके, अलका दानवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

आयुक्तांनी पाहिला नाही आराखडा, नकाशे : शहरविकास आराखड्यातील नकाशे पालिकेला देण्यात आले आहेत. शहरातील सर्व नगरसेवक, काही नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी ते हस्तगत केले. मात्र, मनपा आयुक्त सुनील केंद्रेकरांनी ईएलयू आणि पीएलयू हे दोन्ही नकाशे पाहिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.