आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांची लाच घेताना एमआयडीसीतील अभियंता, वॉचमन अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घराच्या बांधकामासाठी बँकेचे कर्ज काढण्यासाठी आवश्यक फोर पार्टी अॅग्रिमेंटसाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) स्थापत्य विभागातील सहायक कार्यकारी अभियंत्यासह वॉचमनला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (३० एप्रिल) रात्री ११.३० वाजता हॉटेल द्वारका येथे ही कारवाई केली. रवींद्र श्रीहरी डावकर (३९) आणि राकेश उदयसिंह चौहान (३०) अशी अटकेतील लाचखोर आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराचे घर एमआयडीसी कार्यक्षेत्रात आहे. त्याला घराच्या बांधकामासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे होते. कर्जप्रकरणासाठी फोर पार्टी अॅग्रिमेंट आवश्यक होते. यासाठी तक्रारदाराने एमआयडीसीकडे अर्ज केला होता. सहायक कार्यकारी अभियंता डावकर (रा. एमआयडीसी कॉलनी, स्टेशन रोड) यांनी तक्रारदारास काम करण्याची हमी दिली. हे काम कार्यालयातील घाटे आणि गायकवाड यांच्याकडे असून त्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने १० हजार रुपये दिल्यानंतर डावकर याने काम करून दिले; परंतु उर्वरित हजार रुपयांसाठी तगादा लावला होता.

वॉचमनमार्फत घेतली लाच : तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणी करून सापळा लावला. ३० एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हॉटेल द्वारका येथे वॉचमन चौहान (रा. एमआयडीसी कॉलनी, रेल्वे स्टेशन) याच्यामार्फत डावकर याने हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर तातडीने चौहानसह डावकरला अटक करण्यात आली.
रवींद्र डावकर यांनी बजावली कामगिरी

ही कामगिरी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, अजय आवले, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब महाजन, चालक दिनेश गायकवाड, शेख मतीन यांनी बजावली. आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ हे करत आहेत.