आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती बसस्थानकातील दलालांच्या मुसक्या आवळल्या; रोज राहणार नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बसस्थानकातील अनागोंदी कारभाराबाबत डीबी स्टारने वृत्त प्रकाशित करताच अधिकार्‍यांनी प्रथमच दलालांविरोधात धडक कारवाई केली. सर्व प्रमुख अधिकारी स्थानकात पहारा देत उभे असल्याचे पाहून प्रवासी पळवणार्‍या दलालांनी काढता पाय घेतला. त्यात प्रवाशांशी गाडीबाबत उघड उघड बोलताना एका दलालाला अधिकार्‍याने स्वत: पकडून स्थानकातील चौकीत नेले. त्याच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दलालांचे प्रस्थ संपुष्टात आणण्यासाठी यापुढे रोज किमान 5 दलालांवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेशच शनिवारी वरिष्ठ आगारप्रमुख किशोर सोमवंशी यांनी वाहतूक अधीक्षकांना दिले.

मध्यवर्ती बसस्थानकात 200 मीटरच्या आत येण्यास दलालांना नियमानुसार मनाई आहे. तरीही बघे अधिकारी आणि रिकामी पोलिस चौकी यामुळे त्यांचा धुमाकूळ सुरू आहे. आतमध्ये एकाच वेळी पाचपंचवीस दलाल येतात व खुलेआम प्रवाशांची पळवापळवी करतात. लगेच गाडी सुटणार आहे, असे सांगून त्यांना फसवतात. दलालांच्या या मुख्य समस्येसह स्थानकातील अतिक्रमण, सीसीटीव्ही व मॉडर्न बसस्थानकाचा प्रस्ताव रखडल्याच्या प्रमुख प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डीबी स्टारने सतत दोन दिवस छापा मोहीम राबवली. 1 जून रोजी ‘दलाल, अतिक्रमणाला अधिकार्‍यांचे अभय’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी स्थानकातील सर्व अधिकार्‍यांनी पोलिसांसमवेत दलालांवर करडी नजर ठेवली.

एकाविरुद्ध नोंदवला गुन्हा
वरिष्ठ आगारप्रमुख किशोर सोमवंशी, कनिष्ठ आगारप्रमुख एस. टी. सोनवणे, सहायक वाहतूक अधीक्षक एम. बी. जेवळीकर, पोलिस हेड.कॉन्स्टेबल एन. के. पवार यांनी सकाळपासूनच स्थानकात नियोजनबद्ध पाहणी केली व करडी नजर ठेवत जरब निर्माण केली. त्यांना पाहताच रोज येणारे बहुतांश दलाल बाहेर पळाले. या वेळी गोविंद क्षीरसागर नावाच्या एका दलालाला स्वत: वरिष्ठ आगारप्रमुख सोमवंशी यांनी पकडले आणि स्थानकातील चोकीत नेऊन पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी रोज किमान 5 दलालांवर कारवाई करा, असे आदेशही त्यानी बसस्थानकातील सर्व अधिकार्‍यांना दिले.