आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mika's Song Bring Smile On HIV Positive Children Face

मिकाच्या गाण्याने फुलले एड्सबाधित मुलांचे चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद पोलिस वेलफेअर फंडसाठी रविवारी पॉप सिंगर मिका सिंग यांचा लाइव्ह शो झाला. तिकीट खरेदी करून अनेक रसिकांनी ही सुरेल पर्वणी साधली. मात्र, गरीब आणि एड्सग्रस्त मुलांसाठी एवढा खर्च कोण करणार, या विचारातून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पुढाकार घेत धर्मवीर राजे संभाजी बालगृहातील एड्सबाधित ४५ मुला-मुलींसह कर्मचाऱ्यांना हा सोहळा अनुभवण्याची संधी दिली. मिका सिंग यांच्या गाण्याचे बोल कानी पडताच फुललेले या मुलांचे चेहरे पाहून उपस्थितांचा आनंदही द्विगुणित झाला. शहरात असा कार्यक्रम होणार याची माहिती मिळताच तिकिटे खरेदी करण्यासाठी रसिकांची चढाओढ सुरू होती. मात्र, बालवयातच असाध्य आजाराचा सामना करणाऱ्या या मुलांना तिकिटाचा खर्च झेपण्यासारखा नव्हता.

कार्यक्रम पाहण्याची इच्छा असणाऱ्या या मुलांसाठी झटणाऱ्या संस्थेतील कार्यकर्त्यांसाठीही हा खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पुढाकार घेत पोलिस प्रशासनाला विनंती करून विशेष व्यवस्था केली. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयले, अमरजीतसिंग चव्हाण, केतन देशपांडे, पवन गहेरवार, आनंद आंभोरे, अजय खाडे यांची तयारी एक दिवसआधीच पूर्ण झाली होती. रविवारी सायंकाळी हाती विशेष पास घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या या मुलांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव होते. कार्यक्रमस्थळी नाष्टा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. रात्री नऊपर्यंत कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर जेवण करून परतण्यासाठी निघालेली ही मुलं वेगळ्याच विश्वात होती.

समाधान मिळाले
सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलांना हा सोहळा अनुभवता यावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले. अवीक बिस्वास, मुख्यजनसंपर्क अधिकारी

मुलांसाठी पर्वणी
आत्तापर्यंत अनेकजणांनी मदतीचा हात दिला. या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक जण बालगृहातही येतात. मात्र पोलिस प्रशासन आणि सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेली संधी मुलांसाठी पर्वणी ठरली. नितीन वाकुडे, संस्थाचालक,बालगृह