आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Military Recruitment Youth Lunch Responsibility Of Fedral

सैन्य भरती तरुणांच्या भोजनाची सांघिक जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मराठवाडा आणि खान्देशातील नऊ जिल्ह्यांतील हजारो तरुण सैन्य भरतीसाठी आलेले आहेत. त्यांच्या जेवणाची सोय करण्याची जबाबदारी शहरातील काही क्लबनी घेतली आहे. त्यांच्यामार्फत या तरुणांना दुपारचे जेवण पुरवले जात आहे.

१० जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी लायन्स, रोटरी आणि गुरुद्वारा लंगर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. भरतीसाठी आलेल्या या तरुणांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही करू शकत नाही, तुम्ही यासाठी आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार क्लबच्या सदस्यांनी वर्गणी जमा करून भावी सैनिकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
मंगळवारी आणि बुधवारी रोटरीच्या वतीने उमेदवारांना दुपारचे जेवण पुरवले गेले. मंगळवारी ६००, तर बुधवारी ९०० जणांनी जेवणाचा लाभ घेतला. चांगल्या दर्जाचे जेवण एमजीएमच्या हॉटेल मॅनेजमेंटकडून तयार करण्यात आले होते. एमजीएमनेदेखील नो प्रॉफिट नो लॉस या तत्त्वावर जेवणाचे पार्सल दिले. यामध्ये पोळ्या, भाजी, वरण-भात, आणि केळी याचा समावेश होता. रोटरी ग्रुपच्या सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये वर्गणी जमा करून दोन दिवस २६ हजारांची लंच पाकिटे देण्यात आली. या वेळी रोटरीचे अध्यक्ष उद्धव शिरसाठ, प्रवीण पवार, भारत चोपडे, कैलास बिनायके, बालाजी सिंग, अनंत देशपांडे, रवी वतनी, उमेश बोरसे यांची उपस्थिती होती.

लायन्स क्लब औरंगाबाद क्लासिकचे अध्यक्ष अमोल गंभीर यांना याबाबत विचारले असता त्यांनी आम्ही २७, ३० आणि ३१ रोजी लंच पाकिटांचे वाटप करणार असल्याचे सांगितले.

राहण्याची गैरसोयच
२१जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान भरती प्रक्रिया होत आहे. भरतीसाठी येणारे तरुण सर्वसामान्य वर्गातील असल्याने त्यांना लॉजमध्ये थांबणे परवडत नाही. त्यांच्यासाठी निवास व्यवस्था करणे ही जबाबदारी सैनिक कल्याण विभागाची आहे. मात्र, तसे झाले नसल्याने बुधवारी या तरुणांना रात्र फुटपाथवर, दुकानाच्या आडोशाला काढावी लागली. या तरुणांची विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये निवास व्यवस्था केली जाऊ शकली असती, असे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले.