आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, हे दूध नव्हे विष!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीर तंदुरुस्त व निरोगी राहावे, रोगराई दूर व्हावी आणि पौष्टिकता टिकून राहावी यासाठी आपण दररोज दूध घेतो. भारतीय संस्कृतीत दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवांना दुग्धस्नान घालण्याची परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेत गोपिकांसोबतच गवळी आणि पर्यायाने दुधाचा संबंध आलाय. थेट देवतांशी संबंध आल्याने दूध अमृततुल्य मानले जाते. मात्र, हेच दूध आज विष ठरत आहे. थोड्याशा फायद्यासाठी दररोज निसर्गाशीच छेडछाड केली जात आहे. गाई-म्हशींची दूध देण्याची नैसर्गिक क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचा वापर पशुपालक करत आहेत. इंजेक्शनद्वारे हे हार्मोन गाई-म्हशींना सकाळ-संध्याकाळ दिले जात आहे. ‘डीबी स्टार’ने या प्रकरणाचा मागोवा घेतला तेव्हा खळबळजनक माहिती हाती लागली. शहरालगत वाळूज, सातारा, चिकलठाणा, पिसादेवी, देवळाई, नारेगाव, बेगमपुरा आणि भावसिंगपुरा भागातील गोठ्यात गाई-म्हशींना खुलेआम ऑक्सिटोसिन दिले जात आहे. बंदी असतानाही चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला यावर कारवाईचे अधिकार आहेत; पण पुरावा मिळत नसल्याचे सांगून अधिकारी हात वर करत आहेत.
ऑक्सिटोसिनचा गैरवापरच - या कृत्रिम हार्मोनचा वापर केवळ आणीबाणीच्या प्रसंगीच करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने याचा वापर भलत्याच कारणांसाठी होत आहे. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत ऑक्सिटोसिनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. देशभरातून शालेय मुलींचे अपहरण करायचे आणि त्यांना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देऊन अकाली वयात आणण्याचा खटाटोप करणारी टोळी या साठ्यामागे कार्यरत होती. त्या मुलींना नंतर वेश्याव्यवसायात ढकलले जात असे. आता ऑक्सिटोसिनचा वापर गुरांवरही होतोय. गाई-म्हशींचे जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी हे भयंकर हार्मोन वापरले जातेय. शहरी भागात चारा कमी असतो. तसेच गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे ओला किंवा कोरडा दुष्काळ पडत आहे. परिणामी, चाराटंचाई भासते. चारा कमी म्हणून गुरे दूधही कमी देतात. त्यातूनच त्यांच्यावर या हार्मोनचा वापर करून अधिक दूध मिळवण्याचा गोरखधंदा सुरू झाला.
असा आहे हिशेब - साधारणत: वासरास जन्म दिल्यानंतर गाई-म्हशी 5-6 महिने दूध देतात; पण ऑक्सिटोसिनचे डोस दिल्यानंतर ही जनावरे आणखी 4-5 महिने दूध देतात. या जनावरांना पान्हा फुटण्यासाठी या हार्मोनचा वापर केला जातो. मात्र, हे दूध घातक असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दूध जास्त मिळावे म्हणून काही पशुपालक वासरू जन्मताच ते मारून टाकतात. त्यामुळे दिवसाला एक लिटर दूध वाचते. त्यानुसार सात महिन्यांत सरासरी 200 लिटर दुधाची बचत होते. म्हणजेच 30 रुपये लिटरप्रमाणे 6 हजार रुपयांसाठी माणुसकीला काळिमा फासण्याचे काम काही पशुपालक करतात.
स्वस्ताईमुळे वाढला वापर - ऑक्सिटोसिनच्या वाढत्या वापराला त्याची किंमतही कारणीभूत आहे. हे हार्मोन खूपच स्वस्त आहे. पशुपालक सकाळ-संध्याकाळ गुरांना दोन इंजेक्शन्स देतात. एका डोसची किंमत केवळ 50 पैसे आहे. दिवसाला एक, तर महिन्याला 30 रुपये लागतात. दूध देण्याच्या सात महिन्यांच्या कालावधीत एका गुरासाठी 210 रुपये खर्च येतो.
...हे तर स्लो पॉयझनिंग - दुधात ऑक्सिटोसिनचे अत्यल्प प्रमाण येते; पण हे थोडे प्रमाणच स्लो पॉयझनिंगचे काम करते. त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळते. बालरोगतज्ज्ञ डॉ.सुनील मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ अशा दुधाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, मूत्रविकार, थकवा, दृष्टिदोषापासून बहिरेपणाचाही धोका आहे. त्याच्या वापरामुळे लहान मुलांच्या मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो. गर्भाशयाचा कर्करोग, लैंगिक दुर्बलता, कमी वयातच जननेंद्रियांचा विकास आणि काविळीचाही धोका निर्माण होतो. गर्भवती महिलांनी अशा दुधाचे सेवन केल्यास गर्भपाताची शक्यता असते.
केंद्र सरकारने घातली बंदी - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 1997 रोजी एका पत्राद्वारे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स कायद्याप्रमाणे ऑक्सिटोसिनच्या वापरावर बंदी घातली आहे. हे ‘शेड्यूल एच’ यादीतील हार्मोन आहे. गुरांवर त्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नियमाप्रमाणे ‘शेड्युल एच’ची औषधे घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते. तसेच पशु अधिनियम 1960 च्या कलम 12 आणि अन्न व औषध भेसळ कायद्यानुसारही या हार्मोनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही शहरात त्याची बिनबोभाट विक्री होत आहे. छावणीतील काही दुकानांत ऑक्सिटोसिनच्या बाटल्या उपलब्ध असल्याच्या ‘डीबी स्टार’च्या पाहणीत उघड झाले.
कुठून येते औषध? - शहरातील पशुपालकांपर्यंत ऑक्सिटोसिन नियमित पोहोचते. शहरात त्याची कुठे विक्री होते याची माहिती पशुपालक देत नाहीत. ‘डीबी स्टार’ला मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिटोसिन तयार करणा-या कंपन्यांचे प्रतिनिधी स्वत: गोठ्यापर्यंत हे इंजेक्शन पोहोचवतात. या बाटलीवर कोणतेच लेबल नसते. कुठे तयार झाले याचाही उल्लेख नसतो. वेगवेगळ्या मार्गाने आणि विविध पद्धतीने हे इंजेक्शन पोहोचत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, असा दावा अन्न व औषध प्रशासन करत आहे.
कठोर शिक्षेची तरतूद - ऑक्सिटोसिनची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री करणा-या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द होऊ शकतो. विक्रेत्यास 5 वर्षे कारावास व आर्थिक दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. ऑक्सिटोसिनचा वापर करणा-या पशुपालकांना 1 ते 3 वर्षे कारावास व आर्थिक दंडाची तरतूद आहे; पण त्यासाठी आवश्यकता आहे जागरूक नागरिकांनी तक्रार करण्याची.
गुरांवरही दुष्परिणाम - ऑक्सिटोसिनचा गाई, म्हशींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. गुरांची प्रजननक्षमता कमी होते. त्यामुळे ही गुरे काहीच कामाची राहत नाहीत.
काय आहे ऑक्सिटोसिन ? - ऑक्सिटोसिन हे मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीत तयार होणारे आणि तेथेच साठवले जाणारे हार्मोन आहे. महिलांमध्ये प्रसूती वेदना वाढवून गर्भपिशवीचे तोंड उघडण्यासाठी स्टिम्युलेटर म्हणून या हार्मोनचा वापर डॉक्टर करतात. तसेच दूध येण्यासाठी उत्पे्ररक म्हणूनही ते काम करते. त्याच्या अति वा चुकीच्या वापरामुळे गर्भाशयाची पिशवी फाटण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे केवळ अत्यावश्यक प्रसंगीच त्याचा वापर केला जातो.
नोबेल विजेता शोध - गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी महत्त्वाचे ठरणारे नैसर्गिक ऑक्सिटोसिन 1955 पासून कृत्रिमरीत्या बनवता येऊ लागले. जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. विन्सेंट डी व्हिगनिऑड यांनी हा शोध लावला आणि या कार्यासाठी त्यांना रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कारही देण्यात आला. मात्र, सबंध मानवजातीच्या कल्याणासाठी लावण्यात आलेला हा शोध दुभत्या जनावरांसाठी शाप ठरेल, याची त्यांनाही कल्पना नसावी.
काय म्हणतो अहवाल ? - नवी दिल्लीतील ‘डीएव्ही रिसर्च सोसायटी फॉर हेल्थ’चे संचालक डॉ. आर. पी. पराशर यांनी ऑक्सिटोसिनच्या गैरवापरावर संशोधन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीत जवळपास 65 टक्के दुभत्या जनावरांवर ऑक्सिटोसिनचा वापर केला जातो. उर्वरित भारतात ही टक्केवारी 50 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच महाराष्ट्रात मिळणा-या सुमारे 65 टक्के दुधात ऑक्सिटोसिनचा अंश येतो.
हे हेरॉइनपेक्षा खतरनाक - ४ऑक्सिटोसिनचा गुरांवर वापर म्हणजे क्रौर्याची परिसीमाच आहे. त्याचा फटका केवळ प्राण्यांनाच नव्हे, तर माणसांनाही बसतो. ऑक्सिटोसिनयुक्त दुधामुळे भावी पिढ्या अपंग होऊ शकतात. हे हार्माेन हेरॉइनपेक्षाही खतरनाक आहे. जर कुणालाही गुरांच्या अंगावर इंजेक्शन टोचल्याचे निर्दशनास आले तर त्याची तक्रार करा. ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट’च्या कलम 12 नुसार हा प्रकार दंडनीय अपराध आहे. - मनेका गांधी, अध्यक्षा, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स
कायद्याचा धाक हवा - उच्च न्यायालय आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ऑक्सिटोसिनवर बंदी घातली आहे. तरीही त्याचा सर्रास वापर होतो. यावर बंदी आणण्यासाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत; पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. तसे झाले तर कोट्यवधी लोकांचे आरोग्य अबाधित राहील. - रणजित शेडगे पाटील, वकील, उच्च न्यायालय
आम्ही जनजागरण करतोय - ऑक्सिटोसिनचा वापर होतोय किंवा नाही याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नाही. कारण आमच्या क्लिनिकमध्ये पशुपालक गुरांना केवळ विविध रोगांवर उपचारांसाठी आणतात. त्यांना घरी नेल्यानंतर त्यांचे मालक काय करतात हे आम्ही सांगू शकत नाही. तरी तीन वर्षांपासून क्लिनिकमध्ये येणा-या प्रत्येक पशुमालकाला ऑक्सिटोसिन न वापरण्याबाबत माहिती देत आहोत. कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत, तर एफडीएला आहेत. - डॉ. मोहंमद मोईनोद्दीन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
लोकांनी तक्रार करावी - पशुवैद्यकीय वापरासाठी ऑक्सिटोसिनवर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्याचा वैद्यकीय वापर वैध आहे. या बाबीमुळेच या प्रकरणातील आरोपी सुटतात. ऑक्सिटोसिनची विक्री कशासाठी केली जात आहे, याचा खुलासा होत नाही. कायद्यातील पळवाटा आरोपींसाठी पोषक आहेत. त्याचा वापर करणा-या पशुमालकांबरोबरच त्याची विक्री करणारेही दोषी आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लोकांना याबाबत माहिती मिळाली तर त्यांनी तक्रार करावी, निश्चित कारवाई करू. - एस.के.शेरे, सहायक आयुक्त (अन्न-औषध प्रशासन)
ऑक्सिटोसिन धोकादायकच - ऑक्सिटोसिनचा वापर वैद्यकीय क्षेत्रातही क्वचितच केला जातो; पण दररोज दुधात याचा अंश येत असेल तर ही गंभीर बाब आहे. पिशवीतील दूध पाश्चराइझ्ड असते. ते उकळून पुन्हा थंड केल्यामुळे त्यातील ऑक्सिटोसिनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे सुटे दूध घ्यावे किंवा नाही यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतानाही त्यामागील धोके लक्षात घ्यावे लागतील. - डॉ. सुनील मदने, बालरोगतज्ज्ञ