आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Youth Not Happy With MIM Behavior In Aurangabad

एमआयएमविषयी तरुणांमध्ये नाराजीचा सूर, मुस्लिम तरुणांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएममधील तिकीटवाटपावरून उडालेला गोंधळ, पैसे घेतल्याचा आरोप, नेत्यांची गटबाजी या सर्व प्रकारामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून एमआयएम नेते विरुद्ध असंतुष्ट गट असा वाद जोरात सुरू आहे.
हाणामाऱ्या, पोलिसांकडे तक्रार या सर्व प्रकारामुळे पक्षाविषयीची सर्वसामान्य लोकांमधील प्रतिमा, मलिन झाली आहे, अशा प्रतिक्रिया मुस्लिम समाजातील काही तरुणांनी व्यक्त केल्या आहेत.हाणामाऱ्या, नेत्यांची वाहने अडवणे, गोंधळ घालणे या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
एमआयएमकडे कोणतेही ठोस धोरण नाही. नेते जास्त झाले आहेत. विधानसभा लाटेचा फायदा होईल, यासाठी पक्षात तिकीटवाटपावरून गोंधळ उडाला होता. मात्र, पक्षात जे काही सुरू आहे ते थांबणार नाही. त्यामुळेच पक्षाची लोकप्रियता घटत चालली आहे. आवेसशेख
एमआयएमसारखे इतरही राजकीय पक्ष आहेत. मात्र, एमआयएममध्ये सर्व काम बेशिस्तपणे चालू आहे. शहरात हा पक्ष जास्त काळ टिकू शकणार नाही. एक लाट होती म्हणून विधानसभेत त्याचा फायदा पक्षाला झाला होता. मात्र, आता गुंडगिरी प्रचंढ वाढली आहे. शेख मोहसीन
नेते, कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात. मात्र, एमआयएममध्ये जे काही सुरू आहे ते पक्षातील अंतर्गत वाद आहे. परंतु शहरातील जनतेची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनाही धावपळ करावी लागते. बंदोबस्त वाढवावा लागतो. आता हे थांबवणे गरजेचे आहे. शहेबाजखान
विधानसभेत एक चांगली संधी एमआयएमला मिळाली होती. मात्र, तशी परिस्थिती त्यांनी टिकवून ठेवली नाही. एमआयएममध्ये चांगले लोक काम करत नाहीत, असेच त्यांच्या भांडखोर वृत्तीमुळे दिसून येत आहे. पक्षात शिस्त नसल्याचे यावरून सिद्ध होते. बिस्मिल्लाखान
एमआयएममध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे जनतेमध्ये तीव्र रोष आहे. राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपसात भांडत बसले तर त्यांच्याकडून कोणत्याही विकासाची अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पक्षाला मतदारांनी थारा देऊ नये. आबिदखान
एमआयएमचे नेते, कार्यकर्ते दररोज भांडण करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात चीड निर्माण होत आहे. राजकीय पक्षाची मंडळी जर तिकिटावरून एकमेकांच्या जिवावर उठत असतील तर अशा पक्षांना जनतेने थारा देऊ नये. पक्षाची लोकप्रियता घटली आहे. शेखइम्रान
नेते, कार्यकर्त्यांमधील वाद, ओवेसींनी नेत्यांना झापले

एमआयएममधील वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. स्थानिक नेतेच वाद वाढवत आहेत, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत ओवेसींनी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी, डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांना फोन करून चांगलेच खडसावले.

पक्षाचे नेते आणि नाराज कार्यकर्ते यांच्यामध्ये तिकीटवाटपावरून दररोज वादावादी, हाणामाऱ्या होत आहेत. दगडफेक, तोडफोड, वाहन अडवणे, आरोप-प्रत्यारोप, पोस्टरबाजी असे प्रकार सध्या शहरात सुरू आहेत. यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. ही बाब ओवेसींनी गांभीर्याने घेतली असून असे प्रकार होता कामा नयेत, असे सांगत जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी आणि डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांना खडे बोल सुनावले आहेत.
कार्यकर्ते सांभाळता येत नसतील तर राजकारण कशासाठी करता? अशा शब्दांत फोनवरून सुनावल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यामुळे पक्षातील वादावादीच्या घटनांवर काही प्रमाणात अंकुश बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. कादरी, कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.