आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीच्या बालेकिल्ल्यात एमआयएमचे उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) ६० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना-भाजपच्या बालेकिल्ल्यातही एमआयएमचे उमेदवार धडकतील, असे आमदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ४ किंवा ५ एप्रिल रोजी पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असून स्वतंत्र लढणारा एमआयएम हा महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आमदार जलील म्हणाले, शहरात आमच्या पक्षाला मिळत असलेला नागरिकांचा पाठिंबा पाहून काही राजकीय पक्ष खोटे वक्तव्य करत आहेत. मुळात विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नवीन मुद्दाच मिळत नाही. नामांतरापेक्षा लोकांना विकास हवा आहे. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याशिवाय पक्षांनी काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

६० जागा लढवणार
जीटीएल, समांतर योजना आदी माध्यमातून युतीच्या सत्ताधा-यांनी स्वत:चे खिसे भरण्याचे उद्योग सुरू आहेत. यामुळे आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढायचे ठरवले असून सत्ता आल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दलित पक्ष आमच्या संपर्कात असून त्यांना सोबत घेतल्यास ६० जागांमध्ये अजून किमान ५ ते ७ जागा वाढू शकतात. शिवाय पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभाही होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी, डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, महेफूज-उर-रहेमान आदींची उपस्थिती होती.
वाचा.. भाकपचे ८ उमेदवार जाहीर