आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM MLA Imtiyaz Jalil Interview In Divya Marathi

देव, अल्लाह घरातच ठेवा, त्यांना रस्त्यावर आणू नका - आमदार इम्तियाज जलील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएम पक्षाचे आमदार सय्यद इम्तियाज जलील यांनी ‘गप्पा डावपेचाच्या’ या विशेष सदरात संपादकीय सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. एमआयएमने अगदी प्रारंभापासून धर्मनिरपेक्ष राजकारण केले आहे. त्यामध्ये काही विघ्नसंतोषी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अामच्या संदर्भात विष पेरले आहे. आम्ही कर्मठ, धर्मांध असल्याचे बिंबवण्यात आले आहे. मात्र, हे धादांत खोटे आहे. हिंदू आपल्या ‘देवा’ची, तर मुस्लिम ‘अल्लाह’ची अाराधना करतात. दोन्ही समाजांनी अाराधना आपापल्या घरात करावी. ‘देव’ आणि ‘अल्लाह’ रस्त्यावर आणला, तर शहरात तणाव वाढणारच. प्रसंगी दंगलही होईल. त्यामुळे धर्म, जात राजकारणात आणू नये.

श्रीकांत सराफ : कोणती जबाबदारी मोठी आहे, पत्रकार की आमदार?
२४ वर्षे पत्रकारिता केली; पण बातम्यांच्या पलीकडे काहीच करू शकलो नाही. पत्रकारितेला मर्यादा आहेत. लोकप्रतिनिधींना काही विशेष अधिकार असतात. त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवता येतात. राजकारणात खूप शक्ती आहे. फक्त इमानदारीने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. उदाहरणार्थ घाटीमध्ये ‘एमआरआय’चे दर सामान्य, गरिबांना परवडणारे नसतात. एका वयोवृद्ध महिलेच्या वेदनेतून मला प्रश्न समजला. त्यानंतर मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय मांडला. पालकमंत्री रामदास कदम यांनी लगेच अधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश दिला. आता लवकरच स्वस्त दरात एमआरआय उपलब्ध होणार आहे.

परवेज खान : मग आपण सुशिक्षित उमेदवार देण्याची घोषणा केली होती. ती फोल का ठरली?
हे बघा, आम्ही सर्वाधिक सुशिक्षित उमेदवारांना उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही सातवी-आठवीपर्यंत शिकलेले आहेत, म्हणजे आम्ही भूमिकेला हरताळ फासला असा त्याचा अर्थ होत नाही. झोपडपट्टीबहुल भागांमध्ये अधिक सुशिक्षित उमेदवार शोधणे कठीण होते. समजा एखाद्या चोर, गुंड पदवीधराने उमेदवारी मागितली आणि त्या तुलतनेत सातवी-आठवी उत्तीर्ण उमेदवारानेही उमेदवारीसाठी अर्ज केला, तर आम्हाला कोणता पर्याय स्वीकारावा लागेल? त्यामुळे काही उमेदवार अल्पशिक्षित आहेत, पण प्रामाणिक आहेत.


मंदार जोशी : एमआयएमअंतर्गत मतभेद इतके विकोपाला गेले की हाणामाऱ्या सुरू व्हाव्यात?
हे बघा, मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहेत. प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात. उमेदवारीच्या रस्सीखेचमुळेच आमच्यातील वाद उफाळून आला होता अन् तो साहजिकच आहे, कारण मला आमदार करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. प्रत्येक वॉर्डात चार ते दहा जणांनी मला स्वत:चे पैसे लावून निवडून आणले. त्यानंतर मनपाची निवडणूक आल्यानंतर ‘त्या’ प्रत्येकाने उमेदवारीसाठी दावेदारी केली. आम्हाला प्रॅक्टिकली उमेदवार ठरवण्यात त्यामुळे खूप अडचणी निर्माण झाल्या. त्यातून मतभेद चव्हाट्यावर आले, हाणामाऱ्याही झाल्या हे मी मान्य करतो; पण वर्तमानपत्रात ज्याप्रमाणे प्रसिद्धी देण्यात आली तसे मात्र येथे काहीही घडले नाही, हे मात्र मी नक्की सांगतो.

परवेज खान : उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे सांगण्यात येत आहे?
उमेदवारीपूर्वी आम्ही तोंडी परीक्षा घेतली. त्यामध्ये आम्ही काही जणांना निवडणुकीसाठी किती पैसे खर्च करू शकता, असे प्रश्न विचारले. त्याचे कारण प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी आणि पक्षनिधीही दिला जातो. लोकांचा एमआयएमच्या बाबतीतही तसा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे त्यांची ऐपत लक्षात घेणे गरजेचे होते. मात्र, त्याचा अर्थ आम्हाला पैसे हवे होते, असा नाही. माझे खुले आव्हान आहे की डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरेशी आणि मी स्वत: कुणाकडून पैसे घेतल्याचे सिद्ध करावे. अर्थात, ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांनी आमच्याविषयी अफवा पसरवली आहे.

शेखर मगर : एमआयएमच्या किती जागा निवडून येतील असे वाटते आणि आपले व्हिजन काय आहे?
आकड्यांमध्ये मी जाणार नाही. आपण २३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी आम्हाला चांगले यश मिळणार आहे. व्हिजनविषयी सांगायचे झाले, तर भ्रष्टाचार थांबवून शहराचा आखीव-रेखीव विकास करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. १. रस्त्यांचा विकास, त्यावर त्रयस्थ संस्थेचे क्वालिटी कंट्रोल. २. रुंदीकरणानंतरही पथदिवे हटवले नाहीत, त्याकडे लक्ष देणे. ३. आरोग्यासाठी मनपा रुग्णालयांना स्टाफ उपलब्ध करून देणे. ४. स्वस्त दरात पाणी उपलब्ध करून देणे. ५. भ्रष्टाचार संपवून निधीचे नियोजन करत शहराचा विकास करणे असा प्राधान्यक्रम आहे.

महेश देशमुख : पक्षांतर्गत नाराजीमुळे जागा कमी होतील का?
अजिबात नाही, विधानसभेच्या वेळेलासुद्धा कार्यकर्त्यांनी पंजाचे रुमाल घातलेले होते, त्यांनी मते आम्हालाच दिली. त्यामुळे पक्षात काही वाद उफाळून आलेले असले तरी आम्ही आता एकजूट आहोत. एमआयएमच्या बंडखोरांना नव्हे, मतदार आम्हालाच पसंती देतील. त्यामुळे जागा कमी होणार नाहीत.

संतोष देशमुख : एमआयएमचे कार्यकर्ते तिकिटासाठी रक्तपात करत आहेत, मग निवडून आल्यावर काय करतील?
मी या हाणामाऱ्यांचे मुळीच समर्थन करत नाही. मात्र, एमआयएमच्या एकूण उमेदवारांची, इच्छुकांची संख्या लक्षात घेता हाणामारीच्या घटना तुरळक आहेत. एवढा मोठा रक्तपात झालेलाच नाही. उगाच चार-पाच घटनांना अधिक महत्त्व दिले जात आहे. तिकीट मिळाले नाही, तर नाराजांनी हाणामारी करण्याच्या घटना प्रत्येक पक्षात घडतच असतात.

सतीश वैराळकर : एमआयएममुळे इतर जाती-धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्याला जबाबदार कोण?
भीती बाळगण्याचे कारण नाही. हा देश, हे राज्य, हा समाज जेवढा हिंदूंचा आहे, तेवढा मुस्लिमांचा, दलितांचा, ख्रिश्चनांचा, शिखांचाही आहे. त्यामुळे कुणीही परस्परांचे भय बाळगण्याचे कारण नाही. एखाद्या ठिकाणी कुणी मुस्लिम एखाद्या हिंदूला त्रास देत असेल, तर मला बोलवा. त्या हिंदूंचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे.

हरेंद्र केंदाळे : इतर पक्षांप्रमाणे आपला जाहीरनामा का नाही?
हे बघा, आपण इतर प्रस्थापित पक्षांचे जाहीरनामे काढून बघा. त्यातील किती आश्वासने त्यांनी पाळलेली आहेत. मी आत्मविश्वासाने सांगतो की, त्यातील दहा टक्क्यांचीही त्यांनी पूर्तता केलेली नाही. ९० टक्के आश्वासने जाहीरनाम्यामध्ये वारंवार प्रसिद्ध केले जातात. लोकांनाही त्याचे फारसे काही देणे-घेणे नसते. त्यामुळे आमच्या पक्षाने जाहीरनाम्याशिवाय निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

मंदार जोशी : एमआयएम जातीय, धार्मिक तेढ का निर्माण करत आहे?
अकबरुद्दीन ओवेसी यांचे एक भाषण जर सोडले, तर कोणते तेढ निर्माण करणारे वक्तव्य आम्ही दिलेले आहेत? अकबरुद्दीन हे देशातील एकमेव असे नेते आहेत, ज्यांनी प्रक्षोभक भाषणासाठी ४० दिवस कारावास भोगला. आजही त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे. उर्वरित नेते प्रक्षोभक बोलतात त्यांच्याविषयी मात्र समाज काहीच बोलत नाहीत. कुणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात आहे का? एमआयएम एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. हैदराबाद येथे सलग तीन वर्षे आरक्षण नसताना दलित समाजाचा महापौर आम्ही केला, एकदा उपमहापौर केला. विधानसभेसाठी २० जागा लढवल्या, त्यापैकी २ बौद्ध उमेदवार होते. हैदराबाद येथील पोटनिवडणुकीत ओबीसी सर्व पक्षांनी मुस्लिम उमेदवार दिलेला असताना आम्ही ओबीसी हिंदू महिला निवडून आणली, तरीही माध्यमे आम्ही कर्मठ असल्याचे म्हणत असतात.

मनोज पराती : किती दलितांना आपण निवडून आणणार आहात?
सर्वाधिक परिश्रम आम्ही दलित उमेदवारांच्या बाबतीतच घेत आहोत. त्याचे कारण असे की, त्यांनाही नेतृत्व नव्हते. दुर्दैवाने त्यांच्या नेत्यांनी फक्त वैयक्तिक स्वार्थ साधला. कधीही कार्यकर्त्यांचे किंवा जनतेचे भले केले नाही. त्यामुळे दलितांनी निवडणुकीत चांगली साथ दिली आहे. म्हणूनच त्यांना निवडून आणण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालत आहोत.

महेश देशमुख : दलित कार्यकर्त्यांना साथ दिली, पण राजकीय पक्षांना नाही?
त्याचे कारण असे त्यांच्या राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट खूप आहे. गंगाधर गाडे यांना मुस्लिमांनी मते दिली, पण दलित समाजानेच त्यांना धोका दिला. त्यामुळे आम्ही काळाची पावले ओळखून अनेक राजकीय पक्षांचे प्रस्ताव फेटाळून फक्त कार्यकर्त्यांना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे दलित पक्षांना सोबत घेतले नाही. दलित नगरसेवकांनी सोन्याच्या साखळ्या आणि अंगठ्या घालण्याशिवाय काय केले आहे? खडकेश्वर येथून औषधनिर्माणशास्त्रातील पदवीधराला उभे केले. विधानसभेच्या निवडणुकीत माझ्यासोबत राहणाऱ्या गंगाधर ढगेला भडकल गेट येथून उमेदवारी दिली आहे.

सतीश वैराळकर : वांद्रे पूर्व मतदारसंघात मोठा पराभव का झाला?
मागील वेळी ४९ टक्के, तर यंदा ९ टक्क्यांची घसरण मतदानात झाली आहे. मागील वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, समाजवादी पक्ष वेगवेगळे लढले. यंदा मात्र नारायण राणेंना या चार-पाच पक्षांचा पाठिंबा होता. त्यांच्या धनशक्तीपुढे आमचा निभाव लागणे कठीण होते. राणेंनी २०० रिक्षा लावल्या, तर आमच्या उमेदवाराकडे २० अॉटो रिक्षा लावण्याचीही ऐपत नव्हती. त्यामुळे पराभव झाल्याचे मान्य करतो, पण मोठा पराभव झालेला नाही.

साजिद पठाण : शिवसेनेने मुस्लिमांना मतदानाचा अधिकार देऊ नका, असे म्हटले. त्यावर तुम्हाला काय वाटते?
चुकीचे आहे. मला सांगा, नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये खैरेंसारखा माणूस निवडून येतो. मग भाजपच्या उमेदवारीवर शहानवाज हुसेन कसे पराभूत होतात. मताच्या अधिकाराला विरोध करणे चुकीचे आहे. शिवसेनेला वांद्रे पूर्व मतदारसंघातील बहेरामपाडा येथील मुस्लिमांनी मतदान केल्याचे सांगण्यात येते. हे जर खरे असेल तर मी स्वागत करतो. लोकशाहीच्या दृष्टीने चांगले आहे. तेथे शिवसेनेला मुस्लिम मतदान करत असतील, तर येथील हिंदूंनी एमआयएमला मतदान करावे, असे मला वाटते.

विद्या गावंडे : जाती, धर्माच्या नावावर राजकारण केले जाते. मग युवकांनी कोणाकडे आशेने पाहिले पाहिजे, त्यांच्या प्रश्नांचे काय?
हा खूप चांगला प्रश्न आहे. एमआयएमच्या उमेदवाराने जर जात-धर्माच्या नावाने मत मागण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मत देऊ नका. निवडणुका सामाजिक, राजकीय प्रश्नांवर लढल्या गेल्या पाहिजेत.

तृप्ती डिग्गीकर : आपल्या पक्षात कमी कट्टरतावादी कोण आहे?
मी आधीही सांगितले आहे, अकबरुद्दीन ओवेसी यांनी ४० दिवस कारावास भोगला आहे. न्यायालयात खटलाही सुरू आहे, त्याचा जो काही निकाल लागेल तो मला, माझ्या पक्षाला, नेत्यांना मान्य राहणार आहे. राहता राहिले आताच्या निवडणुकीतील भाषणांवर निवडणूक आयोगाचे लक्ष असते. त्यामुळे प्रक्षोभक भाषणांवर कारवाई केली जात नाही, म्हणजे भाषणे चांगली आहेत. ओवेसी यांनी हैदराबाद येथील विधिमंडळात महाशिवरात्रीसाठी सुटी जाहीर करण्याची मागणी केली होती. हिंदू बांधव उपवास करतात त्यामुळे सरकारी सुटी देण्याचा प्रस्ताव हिंदू पक्षाने नव्हे, तर एमआयएमने दिला होता. त्याचा मीडियाने साधा उल्लेखही केला नाही.

शेखर मगर : हैदराबादप्रमाणे आपणही रोज जनता दरबार का भरवत नाही?
होय, हे राहून गेले आहे. आधी हिवाळी अधिवेशन आले, नंतर मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन आले. त्यानंतर लगेच मनपाच्या निवडणुकाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे मला जनता दरबार सुरू करता आला नाही. आता मात्र निवडणुका संपल्या की सुरू करणार आहे.

श्रीकांत सराफ : उच्चवर्णीयांना उमेदवारी अन् सुरक्षितता द्याल का?
कुणालाही सुरक्षा देण्याची गरज नाही. गरज आहे विकास करण्याची. येथे कुणाच्याही जिवाला धोका नाही. उच्चवर्णीयांना याच वेळी उमेरवादी देण्याचा विचार होता. मात्र, काही कारणास्तव शक्य झाले नाही.
(शब्दांकन : शेखर मगर, छाया : माजिद खान)