आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल इंजिनिअरिंग प्रयोग; सिल्लोडमध्ये एमआयएमची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - एमआयएम पक्षाने सुरू केलेल्या नव्या सोशल इंजिनिअरिंगमुळे सिल्लोड शहरात झालेल्या कार्यक्रमाची तालुक्यात चर्चा असून मुस्लिमांसोबतच दलित तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. मुस्लिमांसोबतच दलित व इतर ओबीसी समाजाला पक्षात घेऊन औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्याने आमदार इम्तियाज जलील व नगरसेवकांचा सत्कार एमआयएम पक्षाच्या सिल्लोड तालुका शाखेचा वतीने शुक्रवारी करण्यात आला.

दीड वर्षापूर्वी झालेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर या पक्षाची पुन्हा एकदा तालुक्यात चर्चा सुरू झाली. त्या वेळी पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी घेतलेल्या सभेला मिळालेला प्रतिसाद हा चर्चेचा विषय होता.
एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, परंतु उमेदवारांना मिळालेल्या मतदानामुळे पक्षाकडे लक्ष वेधले गेले होते. आमदार सत्तार यांच्या नेतृत्वामुळे या भागात हा पक्ष जोर धरणार नाही, असे मत बऱ्याच जणांनी नोंदवले होते. अशोक सोनवणे या दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्याने या पक्षाकडून नगरपालिकेची निवडणूक लढवल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता; परंतु औरंगाबाद विधानसभा पश्चिम मतदारसंघ व महापालिकेत मिळालेले यश, दलित कार्यकर्त्यांना मिळालेली संधी पाहता अशोक सोनवणे यांनी घेतलेला हा निर्णय योग्य हाेता, असे म्हणावे लागेल. या पक्षाकडे आज मुस्लिमांसोबतच दलित व ओबीसी समाजातील तरुण आकर्षित होत असल्याचे दिसते. सिल्लोडच्या कार्यक्रमात बसपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग ही विशेष उल्लेखनीय बाब होती. बसपचे माजी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर पारधे यांची उपस्थिती आश्चर्यचकित करणारी होती. औरंगाबादचा प्रयोग सिल्लोडमध्ये झाल्यास भाजप व काँग्रेसला नवीन पर्याय समोर येऊ शकतो.