औरंगाबाद- एमआयएमने
आपली ताकद वाढवण्यासाठी हैदराबाद, नांदेडच्या धर्तीवर महिला आघाडीची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. डिसेंबरपर्यंत एमआयएमची महिला आघाडी स्थापन होईल, असे सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त महिलांचा राजकारणात सहभाग असावा यासाठी महिला आघाडी स्थापन करणार आहे. काही दिवसांपूवी माजी नगरसेविका अलका पाटील यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे महिला आघाडीमध्ये महाविद्यालयीन तरुणी, उच्चशिक्षित महिला, डॉक्टर, इंजिनिअर ,वकील यांनाही मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे.
एमआयएममध्ये इतर पक्षातील महिला प्रवेशासाठी इच्छुक आहेत. त्यांनी एमआयएमच्या नेत्यांशी संपर्कही केल्याचे समजते. यात माजी नगसेविकांचा समावेश असल्याचे कळते. प्रत्येक वॉर्डात महिला आघाडीची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच एमआयएमही सर्व जातीधर्माच्या महिलांना आघाडीत सामील करून त्यांना काम करण्याची संधी देणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी बरेच पुरुष नेते एमआयएममध्ये दाखल होतील, अशी चर्चा सुरू आहे.