आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादजवळील विलोभनीय "माथेरान'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरापासून अवघ्या दहा किमीवर अंतरावर, शहराच्या उत्तरेला, जटवाडा ओलांडला की तुम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्याच्या दुनियेत शिरता, उंच उंच डोंगररांगा, नागमोडी वळणं
घेत खोलखोल दऱ्यातून फिरणारा घाट तो संपला की, सूर्याची तांबडी किरणं दरीच्या कपारीतून दिसतात आणि शब्द बाहेर पडतात, वाह! क्या बात है! होय, औरंगाबादच्या कुशीतलंच हे माथेरान आहे. हे गेल्याशिवाय कळणार नाही.

पर्यटन विभागाचे दुर्लक्ष असल्याने हा परिसर प्रसिद्धीपासून कोसो दूर आहे. पण एकदा निसर्ग पर्यटन करावा, असाच आहे. हर्सूल तलाव ओलांडला की, जटवाडा गाव लागते. तेथूनच निसर्गाची लोभस रूपे तुम्हाला साद घालू लागतात. वाड्या- तांडे आणि हिरवीगार शेतं ओलांडत आपण शिरतो ते गोळेगाव च्या रस्त्याकडे. वाटेत दोन ते अडीच किलोमीटरचा घाट लागतो. हा घाट अत्यंत विलोभनीय असून तेथे उभे राहून फोटोसेशन केल्याशिवाय पुढे जाण्यासाठी पाऊलच उचलत नाही. कारण शंभर ते दीडशे फूट दरी त्यात असलेली शेती तेथून येणारा बैलांच्या घुंगरमाळांचा मंजूळ आवाज तुमची पावले थांबवतात.

उंच उंच पर्वतरांगा अन् नागमोडी वळणाचे रस्ते असा वेरूळपेक्षाही सुंदर घाट आहे. तो ओलांडला की आपण उंच अशा पठारावर येतो. दोन्ही बाजूची गावे पठाराच्या खाली आहेत. औरंगाबाद व गोळेगाव ते खुलताबादपर्यंतचा परिसर या पठारावरून सहज दिसतो. डोंगररांगांची कातर रांग सूर्यादय अन् सूर्यास्त पठाराच्या खालच्या बाजूला बघताना वेगळेच वाटते. विस्तीर्ण पठारावर लोणार सरोवरासारखे पण छोटेखाणी तळे आहे.

या डोंगररांगावरून आजूबाजूची सर्व हिरवीगार शेती ओढे नाले अन् डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे दिसतात.निसर्गाच्या सान्निध्यात राहून वनभोजन घेता यावे यासाठी शहरातील एका व्यावसायिकाने डोंगरमाथ्यावर सुंदर व टुमदार हॉटेल बांधले आहे. तेथे जाऊन आपण न्याहरीची व्यवस्था ही दरीच्या कोपऱ्यावर केली आहे. डोंगराच्या बाल्कनीतून निसर्गाचे अनेक मूड आपण कॅमेऱ्यात टिपू शकतो.

निसर्गरम्य स्थळ
हिवाळ्यापेक्षाही पावसाळ्यात या भागात गेल्यास निसर्ग भ्रमणाचा आनंद लुटता येतो. पुण्याजवळचे माथेरान, पाचगणी किंवा माळशेज घाट सारखाच हा निसर्गरम्य परिसर आहे. परंतु पर्यटन विभागाचे दुर्लक्ष असल्याने या भागाचा विकास झाला नाही.
स्वर्गीय सुखाचा अनुभव
^मी मुंबईत रमलो नाही. चंदेरी दुनियेत काम करूनही माझ्या गावी दर पंधरा दिवसांनी येतो. या भागातील निसर्ग सौंदर्याने मला जखडून ठेवले आहे. संतोष जोशी, उपसरपंच, गोळेगाव