आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंना नववर्षात ‘मिनी ऑलिम्पिक’ची भेट - पद्माकर वळवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्‍ट्राच्या खेळाडूंनी ठसा उमटवावा तसेच नववर्षात राज्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढवा यासाठी खेळाडूंना नव्या वर्षात ‘मिनी ऑलिम्पिक’ची भेट मिळणार आहे. येत्या फेब्रुवारीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
‘शिवछत्रपती’ पुरस्कार जानेवारीत
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या ‘शिवछत्रपती’पुरस्काराची लवकरच घोषणा करण्यात येईल. यासाठीचे कामही पूर्णपणे झालेले आहे. नवा वर्षाच्या मुहूर्तावर जानेवारीत हे पुरस्कार जाहीर होणार आहेत, असेही वळवी यांनी सांगितले. वर्षभरापासून करार मुदतवाढीच्या प्रतीक्षेत असणा-या क्रीडा मार्गदर्शकांना दिलासा देणारा निर्णयही लवकरच घेण्यात येईल. या क्रीडा मार्गदर्शकांच्या पुनर्नियुक्तीबाबतची घोषणा जानेवारीत केली जाईल, असेही वळवी यांनी या वेळी सांगितले.
असे आहे स्वरूप : या स्पर्धेत महाराष्‍ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि शासनाची मान्यता असलेल्या 27 खेळांचा समावेश असेल. यात कबड्डी, खो-खो, टेनिस, टेबल टेनिस, कुस्तीसारख्या खेळांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेसाठी केवळ महाराष्‍ट्रातील खेळाडूच पात्र असतील.
5.25 कोटी रुपयांची तरतूद
या स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाने अर्थसंकल्पात 5.25 कोटींची तरतूद केली आहे. या निधीद्वारे आता स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येईल.
युवा प्रशिक्षण केंद्र
पुण्याच्या बालेवाडीत लवकरच युवकांसाठी ‘युवा प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात येईल. युवकांना विविध विषयांसंबधीची माहिती मोफत देण्यात येईल. तसेच युवकांना स्वयंरोजगार, स्पर्धा परीक्षांसह विविध प्रकारचे मार्गदर्शनही देण्यात येईल. येत्या फेब्रुवारीपर्यंत हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.
तपानंतर नवसंजीवनी
15 वर्षांनंतर मिनी ऑलिम्पिक स्पर्धेला नवसंजीवनी मिळेल. यापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले जात होते. मात्र, 15 वर्षांपासून या स्पर्धेच्या आयोजनाचा ऑलिम्पिक संघटनेला विसर पडला. त्यामुळे आता राज्य शासनाकडून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.