आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Of State Raosaheb Monster,Latest News In Divya Marathi

आयआयएमसाठी पाठपुरावा करणार; दिल्लीत 7 ऑगस्टला उद्योजकांची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: सीएमआयएच्या वतीने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबत औरंगाबाद आणि जालना येथील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी औरंगाबादेत आयआयएम आणण्यासाठी दिल्ली दरबारी ताकद लावणार असल्याचे आश्वासन दानवे यांनी उद्योजकांना दिले. या बैठकीत रेल्वे, बुद्धिस्ट सर्किट, उद्योगासाठी विमान कनेक्टिव्हिटी, कंटेनर डेपो सुविधा, माल निर्यात करताना होणारा तोटा, इमिग्रेशन सुविधा, पासपोर्ट कार्यालय या समस्या उद्योजकांनी दानवे यांच्या समोर मांडल्या. तत्पूर्वी शहरातील उद्योगांची परिस्थिती मांडणारे प्रेझेंटेशन उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सादर केले. आयआयएमसाठी मी पुढाकार घेतो.
दिल्लीत हा प्रश्न मांडतो; पण त्यासाठी सर्वांना दिल्लीत यावे लागेल 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे, त्याच वेळी मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचीही भेट घेऊ. गरज वाटल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले. याबाबत आठवडाभरापूर्वीच स्मृती इराणी यांना आयआयएम औरंगाबादेत द्यावे म्हणून पत्रही पाठवले असल्याचे दानवे यांनी सांगितले. या वेळी सीएमआयचे अध्यक्ष मुनीष शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे, महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राम भोगले, मिलिंद कंक, अतुल सावे, कमांडर अनिल सावे, कॅप्टन पीयूष सिन्हा, मुकुंद कुलकर्णी, सुनील रायठठ्ठा यांच्यासह औरंगाबाद आणि जालना येथील उद्योजकांची उपस्थिती होती.
मुंडे, गोविंदभार्इंची आठवण
दानवे यांची औरंगाबादेतील उद्योजकांशी औपचारिक स्वरूपातली पहिलीच भेट होती. या आधी आमचे नेते गोपीनाथरावच येत असत. तसेच मराठवाड्याच्या रेल्वेच्या प्रश्नावर गोविंदभार्इंच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम केले, ही दोन्ही दिग्गज माणसे आपल्यातून गेल्याने आता मोठी जबाबदारी वाढली असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
पंतप्रधानांना शहरात आणणार
डीएमआयसीसह आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, रेल्वेचे दुहेरीकर यासह मराठवाड्याला दक्षिण मध्य रेल्वे विभागातून काढून मध्य रेल्वेशी जोडावे, रेल्वे कंटेनरची सुविधा याबाबत पंतप्रधान मोदी यांनाच औरंगाबादला येण्याचे आमंत्रण देतो, त्या वेळी तुम्हीच सर्व प्रश्न मांडा, असेही दानवे यांनी सांगितले.
पुणे किंवा कोल्हापूरशी स्पर्धा
उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांनी आयआयएमबाबत केलेले वक्तव्य आणि पुणे, कोल्हापूर या शहरांची दावेदारी या विषयीची माहिती दानवे यांना दिली. तसेच आयआयएम औरंगाबादसाठी किती महत्त्वाचे यावर चर्चा करण्यात आली. सीएमआयएचे कार्यालय दिल्लीत सुरू करण्याची मागणी या वेळी उद्योजकांनी दानवे यांच्याकडे केली.