आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर दुष्काळी दौऱ्याचा उतारा, ३ मार्चपासून मंत्र्यांचा तालुकानिहाय दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही. शिवाय विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात कमी विकास होत असल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सर्व मंत्र्यांना ३ मार्चपासून तालुकानिहाय दुष्काळी दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळी दौरा मंत्रिमंडळ बैठकीवर उतारा काढण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी तयारीदेखील सुरू केली. परंतु नंतर बैठक पुढे ढकलण्यात आली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जानेवारीत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. पण फेब्रुवारी महिना संपत आला तरी बैठकीचे चिन्ह नाही. मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. मात्र येथील विकासाला गती प्राप्त झालेली नाही. गेल्या वर्षी ११०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर दोन महिन्यांत १२५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून हे सत्र सुरूच आहे. मराठवाड्याला निधी मिळण्याऐवजी येथील प्रकल्प, संस्था विदर्भात गेल्यामुळे जनतेचा रोष वाढत चालला आहे. बैठक झाली असती तर मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लागले असते. पण नवीन सरकार आल्यानंतरही मराठवाड्याच्या हाती काही लागले नसल्याची लोकांची भावना आहे. मार्चपासून मंत्र्यांचे तालुकानिहाय दौरे सुरू होणार आहेत. अधिवेशनाच्या अगोदर या दौऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी पाहणी करून सरकार गंभीर असल्याचे दाखवत आहे. मात्र केवळ दौऱ्याने प्रश्न सुटतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, मराठवाड्यात मंत्री दौरे करत आहेत मात्र निधी, संस्था विदर्भात जात आहेत. मंत्र्यांचे दौरे हे पालकमंत्र्यांचे हे अपयश आहे. एक दिवस दौरा काढून साध्य काय होणार आहे. हा केवळ मलमपट्टी करण्याचा प्रकार असल्याचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. तर मराठवाड्यात सरकारविषयी मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे रिकाम्या हातांनी मंत्री आले तर त्यांचे स्वागत निदर्शनानेच होईल, असे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, यांनी सांगितले. आ. अतुल सावे यांनी मात्र या दौऱ्यामुळेदेखील प्रशासकीय कामाना गती मिळण्यास नक्कीच फायदा होईल, असा दावा केला.
पदरी फारसे नाही
मार्च महिन्यापर्यंत मराठवाड्याचा २०७ कोटींचा आणि एप्रिल ते जूनपर्यंत १४७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. यात टँकर पाणीपुरवठा योजना तसेच चारा छावण्याचे नियोजनदेखील करण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काही प्रमाणात प्रशासकीय कामांना गती मिळेल. मात्र फारसे काही पदरी पडणार नसल्याची टीका करण्यात येत आहे.