आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलांनी केल्या शहरात आठ घरफोड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कॉलेजजीवनात मजा करण्यासाठी एकाने प्रथम चोरीचा मार्ग स्वीकारला. याच विचाराचे त्याला आणखी तिघे जण मिळाले आणि पाहता पाहता विष्णूनगर भागातील चार जणांची गँग बनली. अवघ्या सोळा- सतरा वर्षांच्या या मुलांनी घरफोडी करण्यास सुरुवात केली. आठ घरफोड्या केल्या. यातून मिळालेल्या पैशांत दारू पिणे, हॉटेलात जेवणे अशी मज्जा करतानाच चौघांनीही पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे जाऊन खंडोबाचे दर्शनही घेतले होते.
दोनच दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अक्षय पाटील (१९) आणि विष्णूनगर भागातील तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या आरोपींनी नुकतीच दहावी पास केली आहे. गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावे यासाठी पोलिसांकडून चौघांचेही समुपदेशन केले जाणार आहे.

गेल्या दोन महिन्यांत जवाहरनगर भागात १५ घरफोड्या झाल्या होत्या. या सर्व घरफोड्या एकाच पद्धतीने झाल्या. त्यामुळे पोलिस या भागावर बारकाईने नजर ठेवून होते. विष्णूनगर भागातील काही अल्पवयीन मुलांकडे महागड्या गाड्या आणि मोबाइल आहेत. तसेच यापूर्वी काही गुन्ह्यांत सापडलेला अक्षय पाटील हा आरोपीदेखील त्यांच्यासोबत राहतो, अशी माहिती महिनाभरापूर्वी पोलिसांना कळली. तेव्हापासून पोलिस उपनिरीक्षक सतीश भोसले यांच्या पथकाने या चौघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

सबळ पुरावे सापडताच या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता गेल्या दोन महिन्यांत या गँगने जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे कबूल केले.

या चोरीतील साडेसहा तोळे सोने, चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही, मोबाइल, आयपॅड, कॅमेरे आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, निरीक्षक सुनील तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश भोसले, कैलास काळे, अण्णासाहेब शिरसाठ, मधुकर गोरे, मसुदबी शेख, जालिंदर मांटे, प्रकाश चोपडे, अजिज खान, मोहन चव्हाण यांच्या पथकाने केली.

असे करायचे चोऱ्या
चौघेहीकमी वयाचे असल्यामुळे त्यांच्यावर संशय येत नसे. पाठीवर कॉलेजची बॅग आणि फॉर्मल ड्रेस घालून ते चोऱ्या करायचे. प्रथम ते शेजाऱ्यांना घराचा पत्ता विचारायचे आणि मग चोरी करायचे. दोघे जण घराबाहेर पाळत ठेवायचे. आरोपी पुढच्या दरवाजाने जाता गॅलरीच्या दरवाजाने आत जायचे आणि अवघ्या २० मिनिटांच्या आत चोरी करून बाहेर पडायचे. चोरीच्या पैशातून ते दारू पिणे, गावाला जाण्याबरोबरच इतरही मज्जा करायचे. याच पैशातून त्यांनी जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले.

मन परिवर्तनाचा प्रयत्न करणार
चारआरोपींपैकी तिघे १८ वर्षांच्या खालील आहेत. एकाने नुकतीच दहावीची परीक्षा पास केली आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील हे त्यांचे पहिले पाऊल आहे. त्यांचे मन परिवर्तन कसे होईल यासाठी प्रयत्न करू, असे उपनिरीक्षक सतीश भोसले यांनी सांगितले.