आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी पिढी अधिक प्रामाणिक, कविराज गुलजारांनी थोपटली तरुणाईची पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आमची पिढी भोंदू आहे; पण आजची पिढी तशी नाही. ती प्रामाणिक, पारदर्शी आणि सर्वांपेक्षा अधिक देशप्रेमी पिढी आहे, असे सांगत विख्यात कवी, शायर, लेखक गुलजार यांनी आजच्या तरुण पिढीचे कौतुक केले. मनस्वी व मनाला योग्य वाटेल ते बिनधास्त करणाऱ्या या पिढीला नवा भारत घडवायचा आहे, असे सांगत त्यांनी या तरुणाईची पाठ थोपटली.
"मिर्झा गालिब' या पुस्तकाच्या अंबरीश मिश्र यांनी केलेल्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी औरंगाबादेत झाले. खचाखच भरलेल्या जेएनईसीच्या रुक्मिणी हॉलमध्ये रसिकांशी संवाद साधताना गुलजार यांनी तरुणांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, जग बदलत आहे. मला बदलाची चिंता नाही. ते सांभाळण्याची चिंता आहे. ग्लोबलायझेशन का जमाना है, बडी तेजीसे ग्लोब घूम रहा है. उस तेजीसे तहजिबोंका मिश्रण हो रहा है. बदल तर होणारच; पण ते नाकारायला नको. पाऊस आला तर धान्य सांभाळावे, पाऊस रोखण्याच्या फंदात पडू नये. नवी पिढी ते करत नाही. खरे तर आतापर्यंत कोणकत्याच मागच्या पिढीने पुढच्या पिढीची तारीफ केलेली नाही, पण मी सांगतो की आजची पिढी खरेच प्रामाणिक, पारदर्शक आहे. ते डोळ्याला डोळा भिडवून बोलतात. ही अधिक भारतीय पिढी आहे. त्यांना त्यांच्या मनातला भारत उभा करायचा आहे. गंगा मैली आहे हे त्यांना माहीत आहे, पण ती त्यांना साफ करायची आहे. जगातला दुय्यम दर्जाचा नागरिक होणं त्यांना साफ नामंजूर आहे. बापालासुद्धा यू आर सो मीन म्हणायला धजावणारी ही पिढी स्पष्ट आहे. त्यांचा प्रामाणिकपणा जर आपल्याला शरमिंदा करत असेल, तर आपल्यातच खोट आहे हे नक्की.
आजच्या गालिबच्या नजरेतून तो गालिब : पत्रकार अंबरीश मिश्र यांनी "मिर्झा गालिब' या पुस्तकाचा तेवढाच रसाळ मराठी अनुवाद केला आहे. त्याच मिश्रांनी गुलजारजींची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत गुलजारजींनी गालिबवरील मूळ पुस्तकातील उर्दू उताऱ्यांचे वाचन केले व मिश्रांनी त्याचा मराठी अनुवाद सादर केला. गप्पांच्या ओघात गुलजारजींनी गालिब उपस्थितांना असा काही समजावून सांगितला की तो त्यांच्याप्रमाणेच सर्वांचाच गालिब चाचा होऊन गेला.
गुलजारजींच्याच शब्दातील गालिब...: दिल्लीच्या युनायटेड ख्रिश्चन स्कूलमध्ये मी शिकत होतो. तिथे मुजिबुर रहमान माझे शिक्षक होते. ते शायरी विषय शिकवत. ते तरन्नुममध्ये गझल गायचे नंतर एकेक शेर समजावून सांगत. उनकी एक बात बडी अजीब थी. वो गालिब को चाचा गालिब कहते थे. उन्होने किसीको कभी मामू, मोमीन नही कहा. लेकीन गालिब तो चाचा थे. तबसे लगाव पैदा हुआ. घर के बुजुर्गोंकी तरह. चाचा की सोहबत में तबसे रहा. मार्कांसाठी पाठ केलेला गालिब नंतर मला सतत भेटत गेला. मी पीएचडीसाठी, डीग्रीसाठी गालिब कधी शिकलो नाही. बस पढते गया, बार बार सामने गालिब आते गए. गालिब को जितनी बार पढो नई नई परते खुल जाती है....
गालिब आजच्या काळाला सुसंगत आहे का असे विचारतात. तर मी होच म्हणेन. टेक्स्ट बुकाबाहेरही गालिब समजून घेत गेलो. प्रत्यक्ष आयुष्यात त्याची उपयोगिता समजत गेली. तो कित्येक शतकांपूर्वीचा असला तरी तो आजची भाषा बोलतो. प्रत्येकाशी तो या ना त्या प्रकारे जोडला आहे. त्याच्या शायरीतून आजही अनेक सुभाषिते, वाक्ये मिळतातच ना. इश्क पर जोर नही म्हणणारा गालिब पाहा ना. प्रेम सगळेच करतात पण त्याबाबत बोलायचे झाले तर आधी गालिबच आठवतो. गालिब खूप निर्मळ आयुष्य जगला. त्याची शायरी हे त्याचे भावनांचे प्रकटीकरण होते. जे आयुष्य त्याने पाहिले, ज्या भल्याबुऱ्या गोष्टी त्याच्या जगण्याला स्पर्शून गेल्या त्या त्याने अचूकपणे मांडल्या. गालिब जुगार खेळत पण त्यांनी ते लपवले नाही. जुए को ना गुनाह बनाया न पेशा बनाया. मिर्झा गालिब प्यायचेदेखील. अगदी मेरठहून स्कॉच आणून पीत. पण खुले आम सांगत. भोंदूपणा नसे. त्यांनी आयुष्याच्या प्याल्यातील एकेक घोट आनंदाने घेत निर्मळपणे ते जगले. मी मला गालिबचा तिसरा सेवक मानतो. एक होता कल्लू, तो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिला. दुसरी होती वफादार. आणि तिसरा मी. मी गालिबचे कर्ज चुकवतोय. अनेक पिढ्या हे कर्ज चुकवतील, पण ते फिटणार नाही. त्यांच्या कर्जातच राहावे लागणार आहे. वो बडे हो गए उम्र के साथ, मै साये की तरह पिछे पडा हूँ. मै उनके साथ रहता हूँ.... सदीसे कुछ ज्यादा वक्त लग गया... अफसोस है मुझको....
बालगीतांपासून सिनेमांपर्यंत
मी अजूनही मूलच : बालसाहित्यातील मुशाफिरीबाबत बोलताना गुलजार म्हणाले, मुलांसाठी लिहिताना तुम्हाला त्या वयाचे झाल्याशिवाय लिहिता येणार नाही. मी स्वत:ला लहान मूलच समजतो. मग त्यातून मी लिहितो. चांगल्या बालसाहित्याची सर्वच भाषांत वानवाच आहे. मराठी, मल्याळम व बंगाली सोडले, तर कुठेच काही नाही. हिंदी, उर्दूचे बालसाहित्य शून्य आहे. जे आहे ते अनुवादापुरतेच. पंजाबीसारखी जुनी भाषा असूनही तेथेही शून्यच आहे. मुलांना जे आवडते ते मोठ्यांनाही आवडतेच, असे माझे मत आहे.
नसीरचा गालिब...
मिर्झा गालिब या मालिकेबाबत बोलताना गुलजार म्हणाले की, गालिब बनवताना मला जो आतून गालिब करू शकेल अशा माणसाची गरज होती. नसिरुद्दीन शहाचे नाव डोळ्यासमोर आले. त्याने निर्मात्यांना एवढे मानधन सांगितले की त्यांची वाचाच बसली, पण वरती सांगितले की हा रोल दुसऱ्या कुणाला मी करू देणार नाही. मला त्याचा इगो, थोडेसे औद्धत्य भावले. कारण गालिबही असाच खुद्दार होता. नंतर नसीर म्हणाला, तुम्ही गालिबवर सिनेमा बनवणार होता त्या वेळी मी स्टीफन्स कॉलेजात होतो. तेव्हा पत्र लिहिले होते की गालिब मलाच करायचाय. गालिब पण असाच आपल्या अटीशर्थींवरच आयुष्य जगला. म्हणून नसीरचा गालिब आतून, मनातून आलेला आहे. वेशभूषेने पात्र उभे करता येते यावर माझा विश्वास नाही. पात्र मनातून उभे राहिले पाहिजे...

उर्दूवर संकट नाही : गुलजार म्हणाले की, आज उर्दूवर संकट आले आहे असे म्हणतात ते काही खरे नाही. समोर तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहाकडे बोट दाखवत ते म्हणाले, हे लोक भाषेवर संकट म्हणून आले असतील, तर खरेच संकट आले आहे. उर्दू कुणाला कळत नाही असे नाही. आजची बॉलीवूडची ८० टक्के भाषा उर्दूच आहे. प्रश्न आहे तो लिपीचा. आपण उर्दू बोलतो, ऐकतो पण ती आपल्याला दिसत नाही. पंजाबीसारखे दोन लिप्या असतील, तर काही बिघडत नाही.
गुलजार औरंगाबादी म्हणा...
प्रारंभी वली औरंगाबादी या आद्य शायराचा उल्लेख झाला. त्याचा संदर्भ गुलजारजींनी घेतला. पिछले गुनाहोंकी माफी मांग लूं, तो फिर नए गुनाह करू, असे सांगत सप्टेंबरमध्ये न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, ये जगह उर्दू के जनमसे जुडी जगह है. वली औरंगाबादी का जिक्र हुआ. उनकी पैदायीश यहाँकी है. मेरी पैदायीश भले यहाँकी न हो, फिर भी आप मुझे गुलजार औरंगाबादी कहे तो मुझे कोई ऐतराज नही.... या आधी अंबरीश मिश्र लिखित पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रकाशक अरुण शेवते यांचीही उपस्थिती होती. डॉ. सुभाष देवडे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मिश्र यांनी अनुवादामागील भूमिका सांगितली, तर शेवते यांनी प्रस्तावना केली. विख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रारंभी शहराच्या वतीने शायर बशरनवाज व पं. नाथराव नेरळकर यांनी गुलजार यांचा सत्कार केला.