औरंगाबाद - शहरात टवाळखोरांचे अनेक अड्डे तयार झाले आहेत. काही टवाळखोरांनी तर मर्यादा ओलांडली असून ते आमच्या अंगावर अंडी फेकतात, असा अंगावर काटा आणणारा अनुभव मुलींनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितला. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींनी सांगितले की, काहीजण तक्रार नोंदवण्याच्या नावाखाली हे टवाळखोर संपर्क साधतात आणि अंगप्रदर्शन आणि बोल्ड सीनसाठी कुख्यात असलेल्या सिनेमा नटीसारखे माझ्यासोबत करणार का, अशी विचारणा करतात.
गेल्या आठवड्यात छेडछाडीला कंटाळून एका नववीच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने सर्वेक्षण केले असता शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढत चालले अाहेत. मात्र, सामाजिक दबाव आणि बदनामीच्या भितीने मुली तक्रारी करत नाहीत, असे समोर आले. त्यामुळे अत्याचार निमूटपणे सहन करणाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी विश्वासाची जागा मिळावी, यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला. नाव गुप्त ठेवले जाईल, असे सांगत तुमचे अनुभव सांगा, असे आवाहन केले. आणि जणूकाही मुलींना त्यांचे दु:ख व्यक्त करण्यासाठी मंच मिळाला. अनेक मुलींनी संपर्क साधत त्यांना आपल्या व्यथा मांडल्या.
नाव गुप्त ठेवले जाते : छेडछाडीविषयी पोलिसात तक्रार करणाऱ्या महिला, युवतीचे नाव गुप्त ठेवले जाते. प्रसार माध्यमांनीही पिडीतेची ओळख पटणार नाही, अशाच पद्धतीने वार्तांकन करावे, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सक्त सूचना आहेत.
फोनवरील छेडछाडीविरुद्ध तक्रार नोंदवता येते : कॉलसेंटरवर काम करणाऱ्या तरुणींशी संपर्क साधून कोणी अश्लिल, घृणास्पद बोलत असेल तर कलम ३५४ नुसार पोलिसांकडे तक्रार नोंदवता येते.
छेडछाडीविषयी माहिती द्यायची असल्यास असल्यास तुम्ही ‘दिव्य मराठी’च्या या प्रतिनिधींकडे मन मोकळे करून त्यांना माहिती देवू शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. संपर्क क्रमांक ९९२२९९४३२६, ९९२३०६९९२५.
दिव्य मराठी तज्ज्ञांशी संपर्क साधून मदत करणार : ‘दिव्य मराठी’ केवळ छेडछाडीचे अनुभव जाणून ते प्रसिद्ध करण्यापर्यंत थांबणार नाही. तर त्यापुढेही पाऊल टाकणार आहे. तज्ज्ञांशी संपर्क साधून छेडछाड करणाऱ्यांवर कारवाईसाठी नेमके काय करता येईल, याचा सल्ला दिला जाणार आहे. गरज पडल्यास गुन्हा दाखल करण्यासही मदत केली जाणार आहे.
दिव्य मराठीने माझे शहर सुरक्षित शहरसाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी अनेक पालक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आभार मानले. पोलिसांकडे तक्रार करुन सुद्धा छेडछाडीचे प्रमाण कमी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल, फेसबुकद्वारे त्रास दिला जातो. त्याविषयीही आम्ही तक्रार नोंदवू शकतो का ? अशी काही पालक, मुलींनी विचारणा केली. जगतगुरु नरेंद्र महाराज सत्संग सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुली, युवतींना प्रतिकारासाठी शक्ती देण्याकरिता जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
पैठणगेट चौक धोकादायक
पैठणगेट येथील रिक्षास्थानकाजवळ ज्युस सेंटरच्या रोडवरही महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड केली जाते. टवाळखोर मुले मुलींचा शाळेपर्यंत पाठलाग करतात. अश्लिल शेरेबाजी करतात. त्यामुळे हा चौक धोकादायक झाल्याचे एका जागरुक नागरिकाने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
मारहाण करून हात धरतात
बीडबायबास रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर छेडछाड वाढल्याचे तरुणीने सांगितले. ती म्हणाली की, तेथे मुलींच्या अंगावर अंडी फेकणे, हात धरणे असे धक्कादायक प्रकार नेहमीच होतात. रात्री बेरात्री बियर पिऊन बाटल्या फोडणे, केक कापणे सुरूच असते. जाब विचारला असता मारहाणही केली जाते.
त्या नटीसारखे माझ्यासोबत...
कॉल सेंटरवर काम करणाऱ्या तरुणीने सांगितले की, काही विकृत टवाळखोर एखाद्या प्रॉडक्टची तक्रार करण्याच्या नावाखाली फोन करतात आणि अंग प्रदर्शन करत बोल्ड सीन देणाऱ्या नटीसारखा सीन माझ्यासोबत करशील का, अशी विचारणा करतात. फोन कट केला तर नोकरी जाण्याची भीती असते.