आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता झालेल्या बालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - येथील कल्याणनगर भागात राहणारे शेख अतिक यांच्या साडेपाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह रविवारी शासकीय गोदामालगत असलेल्या कचराकुंडीत आढळून आला. त्यामुळे बिडकीन शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुलांना शोधण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह ताबात घेण्यास विरोध दर्शवला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

कल्याणनगर येथील शेख अतिक यांचा साडेपाच वर्षीय मुलगा शेख अल्तमश हा ९ डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. अतिक व अन्य नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अल्तमश बेपत्ता झाल्याची नोंद घेतली, परंतु ते बालकाचा शोध घेऊ शकले नाही. अखेर रविवारी येथील शासकीय गोदामाच्या पाठीमागे चेंडू खेळत असलेल्या लहान मुलांना कचराकुंडीत त्या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुलांनी सर्वांना हा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते, फौजदार वामन बेले, पोलिस कर्मचारी राजू चव्हाण, दीपक देशमुख, गजानन गायकवाड, दिलीप चौरे, वाल्मीक निकम, महाले हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळी अल्तमशचे वडील व नातेवाईक पोहोचले. त्यांनी तो मृतदेह अल्तमशचा असल्याचे ओळखले. तो कुजलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत अलसटवार हेही पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले, परंतु शेख अतिक यांनी पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप करत मृतदेह देण्यास विरोध दर्शवला. दरम्यान, श्वान पथक बोलावल्याशिवाय मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू देणार नाही, असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने हालीमपु-यापर्यंत माग काढला, परंतु काहीच हाती लागले नाही. रात्री अकरा वाजेपर्यंत गावात तणाव कायम होता.

पोलिसांचा नाकर्तेपणा, पालकांचा रोष अनावर
बालक बेपत्ता होऊन स्थानिक पोलिसांनी कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतली नाही. त्याचा शोध घेण्यासाठी कारवाई केली नसल्याने घटनास्थळी पोलिसांच्या नाकर्तेपणाची चर्चा होती, तर अल्तमशचा खूनच झाला असून संशयिताच्या अटकेसाठी पालक ठाम होते. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.