औरंगाबाद - विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या गोंधळाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. तीन पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमाचे प्रश्न आल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करत असतानाच बुधवारीही मायक्रोबायोलॉजीच्या पेपरमध्ये १० ते १५ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते. विशेष म्हणजे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या विषयाच्या पेपरमध्येच चुका झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमए, एमकाॅम, एमएस्सी आणि बीपीएड, एमपीएडच्या सत्र परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ८०९ विद्यार्थी बसले आहेत, तर एमएस्सीसाठी ४ हजार १५१ विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवसापासून परीक्षांमध्ये गोंधळ सुरू आहे. बुधवारी एमएस्सी मायक्रोबायोलॉजी विषयाचा प्रथम वर्षाचा तिसरा पेपर होता. ५० गुणांच्या या पेपरमध्ये १० ते १५ गुणांचे प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. औरंगाबाद आणि जालना हे दोनच सेंटर या परीक्षेसाठी आहेत. या विषयाला विद्यार्थी संख्याही मर्यादित आहे, तरीदेखील हा गोंधळ का झाला, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला. हा सर्व प्रकार देवगिरी महाविद्यालय केंद्र असलेल्या ठिकाणी घडला.
चौथा प्रकार
परीक्षा विभागाच्या गोंधळाचे सत्र सुरूच आहे. पहिल्या दिवशी एमएस्सी अॅप्लिकेशन स्पेक्ट्रोस्कोपी आणि फॉरेन्सिक सायन्सच्या पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमाचे प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये प्रथम सत्राला द्वितीय सत्राचे प्रश्न विचारले आणि बुधवारी मायक्रोबायोलॉजीच्या पेपरमध्येही असाच गोंधळ झाल्याने विद्यार्थी हैराण आहेत.
लेखी तक्रार नाही
पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न असल्याची लेखी
तक्रार आलेली नाही. विषयाच्या चेअरमनशी चर्चा करून आणि तपासणी करून नेमकी चूक कुणाची आहे, याची खात्री करूनच पुढील कारवाईचा विचार होईल. यासंबंधीची सूचनाही कुलगुरूंना देण्यात
आली आहे.
कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, परीक्षा नियंत्रक.