आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटी ते सातारा गाव रस्ता कामास ठेकेदाराने केला विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारकरांचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा दीड महिन्यावर आली अाहे. त्यापूर्वी गावाचा मुख्य रस्ता असलेल्या एमआयटी महाविद्यालय ते सातारा गाव रस्त्याचे काम व्हावे, यासाठी मनपाने ९६ लाखांची निविदा काढून ती अंतिम केली होती. मात्र, मनपाच्या स्थायी समितीच्या मंजुरीसह कार्यारंभ आदेश दिले नसल्याने ठेकेदाराने काम करण्यास विरोध दर्शवला आहे.
सातारा आणि देवळाई वॉर्डातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात रस्त्याची समस्या महत्त्वाची अाहे. एमआयटी महाविद्यालय ते सातारा गाव या रस्त्याचा मुद्दाही महत्त्वपूर्ण असून याच रस्त्याच्या कामाबाबत पेच निर्माण झाला आहे. अगोदरच सुविधांपासून कोसो दूर असलेल्या सातारा वॉर्डासाठी नगर परिषदेच्या काळात मोठा निधी आला होता. त्यापैकी ९६ लाख रुपयांतून महापौर त्र्यंबक तुपे यांनी एमआयटी ते सातारा गावाचा १३०० मीटर रस्ता सिमेंटचा करण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार त्याची निविदा प्रक्रियाही पार पडली. सप्टेंबर महिन्यात त्यात गौतम कटारिया यांची निविदा अंतिम करण्यात आली होती. त्यानंतर या ठेकेदाराला २१ दिवसांत कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित होते. मात्र, कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी मनपाच्या स्थायी समितीच्या मान्यतेसह प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार या रस्त्यांच्या कामासाठी अद्याप स्थायी समितीची मान्यता घेतली नाही. तसेच प्रशासकीय मान्यताही मिळाली नसल्याने ठेकेदाराला २१ दिवसांच्या आत कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे ठेकेदारानेही नियमावर बोट ठेवून काम करण्यास विरोध दर्शवल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुन्हानिविदा प्रक्रिया राबवावी लागणार
शासनाच्या नवीन नियमानुसार ठेकेदाराने प्रशासनाची चूक दाखवून काम करण्यास मनाई केल्यास नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागते. त्यानुसार आता या कामासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागेल असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले.

कामहोणे आवश्यक
सातारागावात ये-जा करण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे. मूळ गावात राहणारे अनेक ग्रामस्थ तसेच नव्याने वसलेल्या भागातील रहिवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत या रस्त्याचे काम होणे अतिशय महत्त्वाचे आहे.

निर्माण होणार पेच
दीड महिन्यावर आलेल्या वार्षिक यात्रोत्सवासाठी मंदिर संस्थानने तयारी सुरू केली आहे. बहुतांश कामे आटोपली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहनतळ, मंदिराकडे येणारा मार्ग निश्चित करणे आदींसाठी या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.

२४ टक्के कमी दराने निविदा
ठेकेदाराने अगोदरच २४ टक्के कमी दराने निविदा भरली असून त्यात मनपात होणारा खर्च धरून ४५ टक्के कमी दराने काम करावे लागणार होते. यामुळे ठेकेदार नाराज झाला होता. त्यामुळे काम करण्याच्या प्रक्रियेस प्रशासन विलंब करत असल्याची चर्चा मुख्यालयात रंगत आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांकडून काम करण्यास अडचण येत असल्याने कामाला प्रारंभ करण्यात आले नसल्याचे समोर आले. पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ आल्यास नवीन वर्षातच कामाला प्रारंभ होईल, अशी चिन्हे आहेत.

काम करण्याची विनंती करू
^ज्याठेकेदाराने काम घेतलेले आहे, त्यानेच हे काम करावे, यासाठी ठेकेदाराची समजूत घालून काम करण्याची विनंती करू. नव्याने प्रक्रिया राबवल्यास जास्त विलंब होऊ शकतो. वेळेत काम करण्याचा प्रयत्न करू. त्र्यंबक तुपे, महापौर
बातम्या आणखी आहेत...