आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणासुदीत होते मोठय़ा प्रमाणात भेसळ; महिलांनी घ्यावी काळजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणवारांनिमित्त बाजारपेठेत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. याच कालावधित या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या असून प्रशासनाने घेतलेल्या 352 नमुन्यांपैकी 25 नमुन्यांत भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिलांना घरबसल्या अन्न पदार्थांची चाचणी करून भेसळ ओळखावी, असे आवाहन अन्न प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्वयंपाक घरात लागणार्‍या वस्तूची आयात- निर्यात दिवाळीपर्यंत मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे नफेखोरीसाठी अन्न पदार्थांत मोठय़ा प्रमाणात भेसळ केली जाण्याची शक्यता असते. ही भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अन्न-पदार्थांचे अनेक नमुने घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीत 50 हून अधिक पदार्थांत भेसळ झाल्याचे आढळून आहे. उघड्यावरील अथवा साधारण पॅकिंग केलेल्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या 250 नमुन्यांपैकी 21 नमुन्यांमध्ये भेसळ झाली आहे. तर यावर्षी घेतलेल्या 352 नमुन्यांपैकी 25 नमुन्यांत भेसळ असल्याचे आढळले आहे. आणखी 200 नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. यात दूध, मिठाई, गुटखा, धान्य, किराणा सामान आणि फळांच्या नमुन्यांचा समावेश आहे.
भेसळीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
खाद्य पदार्थांत वापरण्यात येणार्‍या धुण्याच्या सोड्यामुळे आतड्याचे विकार तसेच पोटाचे अन्य विकार होतात. खाद्य तेलातील भेसळीमुळे अपंगत्व येण्याची भीती आहे. डाळ पावडर, अथवा मिठाईला देण्यात येणार्‍या मेटॅनील यलो किंवा इतर प्रतिबंध केलेल्या रंगामुळे किडनीचे गंभीर आजार होतात. तसेच गलिच्छ वातावरणात बनवलेली मिठाई व अन्नामुळे विषबाधेची शक्यता असते.
अशी घ्यावी अन्न पदार्थ आणि फळांची काळजी
भंडार्‍याच्या कार्यक्रमात शिजवणारे पदार्थ झाकावे. शक्यतो बंदिस्त खोलीत शिजवावे. शिळे अन्न पदार्थ, मसालेदार खाणे टाळावे. ‘युज अँड थ्रो’ पेले, डिशेस आणि प्लेट स्वच्छ असल्याची खात्री करावी. लिखाण केलेले कागद अथवा पेपरवर गरम पदार्थ ठेवू अथवा देऊ नये.
अन्न पदार्थांतून विषबाधा झाल्यास तत्काळ नजीकच्या दवाखान्यात दाखवावे. घरगुती उपाययोजनेत वेळ घालवू नये. अन्न व प्रशासन विभागाला तत्काळ कळवावे, जेणेकरून असा पदार्थ विक्री करण्यास बंदी आणली जाईल. तसेच 022-26592363 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. भेसळीसंदर्भात शहर कार्यालयाच्या 2344906 या क्रमांकावर तक्रार करावी.
अशी ओळखावी भेसळ
लोणी, तूप, वनस्पती तूप
पातळ केलेल्या एक चमचा तुपात किंवा लोण्यात पाच थेंब तीव्र हायड्रोक्लोरिक अँसिड व अर्धा चमचा साखर टाकल्यास दोन थर तयार होतील. आम्लाचा थर दहा मिनिटात लालसर झाल्यास त्यात भेसळ झाल्याचे ओळखावे. लोणी, दही किंवा पिठाची भेसळ ओळखण्यासाठी त्यावर टिंचर आयोडिनचे पाच थेंब टाकावेत. जांभळा रंग आल्यास भेसळ असल्याचे समजावे.
हळद पावडरची भेसळ
थोडी हळद पाण्यात टाकावी, त्यात हायड्रोक्लोरिक अँसिड टाकल्यास लाल रंग येतो. हा रंग काही वेळानंतरही न गेल्यास त्यात मेटॅनील यलोची भेसळ असते.
मिरची पावडर
मिरची पावडरमध्ये रंगवलेल्या लाकडाचा भुसा, विटांची भुकटी किंवा टाल्कम पावडर असते. ही मिरची पूड जाळून राख करावी. प्रमाणापेक्षा जास्त राख असल्यास भेसळ समोर येते.
पिठीसाखर
पिठीसाखरेत हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास धुण्याचा सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकलेला असेल तर फे स दिसून येईल.
मिठाईमधील मेटॅनील रंग
थोडी मिठाई घेऊन त्यावर तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाका जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील रंग असल्याचे सिद्ध होते.
खव्यातील भेसळ
साखर कंद, सिंघाडा पीठ, वनस्पती तुपाची खव्यात भेसळ केली जाते. खवा हातावर घेऊन रगडल्यास तो हाताला चिकटून घाण वास येतो. भेसळ असलेला खवा खाल्ल्यास तो टाळूला चिकटतो. भेसळ असलेल्या खव्यात आयोडिनयुक्त पाणी टाकल्यावर जांभळा रंग येतो.