आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांमकाचे पाणी पेटले; आढावा बैठकीत पुढारी झाले आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाणीवाटप धोरणात वैजापूर व गंगापूर या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतक-यांना विचारात न घेता हक्काचे पाणी नियोजनाच्या नावाखाली नगर व नाशिक भागात वळवण्याचा प्रकार करू नये. तसे झाल्यास तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत उतरण्याचा इशारा आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांनी बुधवारी नांमका प्रकल्प कार्यालयाच्या आढावा बैठकीत नगर, नाशिकच्या मातब्बर पुढा-यांना दिला.
सिंचन क्रांती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वैजापूर व गंगापूर या दोन कायम दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा प्रकल्प क्षेत्रातील विविध कामांचा प्रगती आढावा,अपूर्ण कामासाठी निधीची उपलब्धता तसेच लाभधारक शेतकरी वर्गाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात आमदार चिकटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीस नांदूर-मधमेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर, सहायक उपअभियंता प्रशांत वनगुजरे आदींसह अधिकारी, लाभक्षेत्रातील पाणीवाटप समितीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांनी नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यात पाणी उपलब्धतेसाठी एकूण चार धरणांपैकी मुकणे, भावली या दोन धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात पाणीसाठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित भाम व वाकी या दोन धरणांची कामे प्रगतिपथावर आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांनी पोटचाऱ्यांची कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची मोठी ओरड केली. प्रकल्पातील हक्काचे पाणी नियोजनाच्या नावाखाली परस्पर नगर व नाशिक जिल्ह्यांत वळवले जाते. पोटचाऱ्यांची कामे मंद वेगाने चालू असल्याने शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहण्याची पाळी नांमकाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे येत असल्याच्या तक्रारीचा पाढा लाभधारक शेतकऱ्यांनी बैठकीत वाचला.
या वेळी फुलंब्रीकर यांनी आपले अपयश झाकण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेली. आ. चिकटगावकर यांनी पोटचाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली व पाणीवाटपात वैजापूर व गंगापूर या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना विचारात न घेता हक्काचे पाणी नियोजनाच्या नावाखाली नगर व नाशिक भागात बिनबोभाट वळवण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

लवकरच कामे पूर्ण करणार
मुख्य कालव्याचे काम पूर्ण झालेले असून पोटचाऱ्याच्या भाग एक कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ९ कोटी २२ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी २ कोटी २३ लाख रुपयांचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी मार्चअखेरपर्यंत प्राप्त होईल, असे आमदार चिकटगावकर यांनी सांगितले. पोटचाऱ्यांची भाग एकमधील २५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शिल्लक ७५ टक्के कामे लवकरच निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.