आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल रावसाहेब दानवेंच्या गळाला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरू केल्याचे समजते. या दोघांत प्राथमिक चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. हा प्रकार समजताच गोरंट्याल यांचे मित्र अब्दुल सत्तार यांनी त्यांना तूर्तास थांबवले आहे. सत्तार यांनीच तशी कबुली दिली.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील मोदी फॅक्टरमुळे गोरंट्याल यांना पराभूत व्हावे लागले. येत्या काळात कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे ते अन्य पक्षात जातील, असे कोणालाही वाटले नव्हते; परंतु प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पक्षवाढीचा एक भाग म्हणून दानवे यांनी अनेक माजी आमदार तसेच पराभूत उमेदवारांना पक्षात घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्याच जिल्ह्यातील गोरंट्याल यांनाही ऑफर दिली. मात्र, सत्तार यांना हा प्रकार समजताच त्यांनी गोरंट्याल यांना तूर्तास थांबवले. सत्तार म्हणाले, गोरंट्याल हे काहीसे अस्वस्थ आहेत. समोरून ऑफर आल्यानंतर त्यांनीही तसा विचार चालवला होता. मात्र, जालना मतदारसंघ हा काँग्रेसी विचाराचा आहे. या वेळी लाट होती तसेच इतर अपक्ष उमेदवारांना जास्त मते मिळाल्याने पराभव झाला. पुढच्या वेळी चित्र बदलेल, असे गोरंट्याल यांना सांगितल्याचे सत्तार यांनी सांगितले. अंतिम निर्णय तेच घेणार असले तरी ते काँग्रेस सोडणार नाहीत, यासाठी मी प्रयत्न करतोय, असे सत्तार म्हणाले.