आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा; ‘एमआयएम’ कार्यकर्त्यांची देशी दारू दुकानात तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व छायाचित्र : रवी खंडाळकर - Divya Marathi
सर्व छायाचित्र : रवी खंडाळकर
औरंगाबाद- चेलीपुरा पोलिस चौकीजवळील देशी दारूच्या दुकानातील सामान काढून त्याची तोडफोड केली. तसेच दुकानातील साहित्य बाहेर काढून जाळून टाकले. ही घटना साेमवारी (ता. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने आम्हाला कायदा हातात घेऊन हे दुकान बंद करावे लागले, अशी प्रतिक्रिया आमदार जलील यांनी दिली.
 
मागील आठ वर्षांपासून बंद असलेले शहागंज परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील महेश द्वारकाप्रसाद जैस्वाल आणि राजेश्वर द्वारकाप्रसाद जैस्वाल यांच्या नावे असलेले देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली मागील आठवड्यापासून सुरू होत्या. हे दुकान बंदच राहावे, अशी मागणी या भागातील नगरसेविका खान सायरा बानो अजमल यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी या दुकानासमोर निदर्शने केली. आमदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने महिला जमल्या होत्या. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. आमदार इम्तियाज जलील यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी लोखंडी साखळी आणि कुलूप दुकानाला लावले. 

अचानक चेलीपुऱ्याकडे मोर्चा...
जैस्वालयांच्या दुकानाला कुलूप लावेपर्यंत सर्व जण शांत होते. त्यानंतर त्यांनी चेलीपुऱ्याकडे मोर्चा वळवला. पोलिस चौकीसमोरील देशी दारूच्या दुकानात घुसून ग्राहकांना मारहाण करत हाकलून दिले. दुकानाचे व्यवस्थापक राजू शेजूळ (रा. चेलीपुरा) यांना ओढून बाहेर काढले. दुकानातील बाकडे, काउंटर आणि दारूच्या बाटल्यांचे बॉक्स दुकानाबाहेर रस्त्यावर आणून त्यांना आग लावली. या नंतर आंदोलनकांनी बेगमपुरा आणि उस्मानपुरा भागातील देशी दारूच्या दुकानांकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, पोलिस निरीक्षक डी. एस. शिनगारे यांनी आमदारांना ताब्यात घेतल्याने जमाव शांत झाला. तोडफोड झालेल्या दुकानाचा परवाना सिडको एन- मध्ये राहणाऱ्या आशा उत्तमराव जाधव यांच्या नावे असून त्यांचा मुलगा संतोष हे दुकान चालवतात. 

आंदोलन सुरूच ठेवू... 
गुन्हेदाखल झाले तरी चालतील मात्र शहरातील दारूचे अड्डे आम्ही बंद करू. शाळा, महाविद्यालये आणि भरवस्तीतील दारूची दुकाने बंद होण्यासाठी आम्ही पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अनेक अर्ज केले. विधानसभेतही प्रश्न मांडला. मात्र काहीही फरक पडला नाही. नाइलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागला. शहरातील ज्या भागातील महिला आमच्याकडे येतील त्या भागातील देशी दारूचे दुकान अशाच प्रकारे बंद केले जाईल. त्याच भागातील महिला या आंदोलनाचे नेतृत्व करतील. शहरातील नागसेन विद्यालय आणि झाकीर हुसैन स्कूलजवळील देशी दारूच्या दुकानांचा पुढील १५ दिवसांत बंदोबस्त करू. हे प्रशासन समाजाच्या भल्यासाठी पुढे येईल की पोलिस बंदोबस्तात दुकाने सुरू ठेवेल हेदेखील आम्हाला पाहायचे आहे. मुख्य म्हणजे एखादा पक्ष म्हणून आम्ही हे काम करत नाही तर जबाबदार नागरिक म्हणून आम्ही हे करत आहोत, असे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

दरोड्याचे कलम लावण्याची तयारी... 
संतोषजाधव यांनी दुकानातील रोख रकमेसह सामानाचे मिळून ३० हजारांवर नुकसान झाल्याचे सांगितले. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे निरीक्षक शिनगारे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र या प्रकरणात सध्या तरी दरोड्याचे कलम लावता कलम ४३५ या मुख्य कलमासह मारहाण, शिवीगाळ अशी विविध कलमे लावल्याचे शिनगारे यांनी सांगितले. कलम ४३५ नुसार जाणीवपूर्वक आग लावल्यास गुन्हा दाखल होतो. यात सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड आणि आंदोलनाचे व्हिडिओ चित्रीकरणही पोलिसांकडे असल्याचे शिनगारे यांनी सांगितले. 

आंदोलक स्वत:हून ठाण्यात हजर... 
दुपारीसाडेबाराच्या सुमारास आमदार इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवक सिद्दिकी नासेर, डॉ. अकमल खान, शेख अहेमद शेख इलियास, रफीक खान रशीद खान, इर्शाद खान इब्राहीम खान, इसाक खान सांडू खान, गंगाधर नामदेव ढगे, विकास एडके, सुभाष वाघुले, मोहम्मद सईद कारकी, फिरोज खान मोईन खान, सलीम अब्दुल शकुर, अब्दुल रहीम नाईकवाडी, सय्यद मतीन, सय्यद रशीद, अजीम खान अहेमद रफीक खान, रफत यार खान, शेख जकार अक्तार, सय्यद मतीन सिटी चौक पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी जाळपोळ आणि तोडफोड आम्हीच केली आहे, असे सांगत या घटनेची जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी या सर्वांची नावे लिहून घेऊन त्यांना सोडून दिले. 
बातम्या आणखी आहेत...